मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर शिवसेनेत दोन गट पडले असून खरी शिवसेना कोणाची यावरुन दोन्ही गटांमध्ये चढाओढ सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी प्रतारणा केल्यामुळे आपण वेगळा पक्ष स्थापन केल्याचे शिंदे गटातील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
असे असतानाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील याबाबत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. हिंदुत्ववादी विचार आता उद्धव ठाकरे यांच्या रक्तात राहिले नसल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः ‘त्यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ…’, राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया)
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्क्रिप्टमधलं बोलतात
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा मूळ विचार सोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला आहे. शरद पवार जेवढं सांगतात तेवढंच उद्धव ठाकरे करतात आणि बोलतात. सामनामध्येही जे लिहून येतं ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेल्या स्क्रीप्टमधलं असतं.
रक्तात हिंदुत्व राहिलं नाही
त्यामुळे उद्धव ठाकरे आता त्यांचा विचार सोडून दिला आहे. आमदार आणि खासदार त्यांना सोडून गेल्यामुळे उद्धव ठाकरे वैफल्याच्या भावनेतून कोणाशीही युती करत सुटले आहेत. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार उद्धव ठाकरे यांच्या रक्तात राहिले नाहीत, असे सांगत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.
(हेही वाचाः राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाबाबत भाजप प्रदेशाध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…)
बाळासाहेबांचे कर्तृत्वही उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदुत्ववादी विचारांची अपेक्षा करणं चूक आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Join Our WhatsApp Community