भाजपचा ‘घर-घर झेंडा’! राज्यात कमळ पुन्हा ‘खुलणार’?

राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती बघता हे सरकार कधीही पडेल आणि राज्यात निवडणुका लागतील, असे भाजपला वाटत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यासाठी भाजपने घर-घर झेंडा अभियान राबवले.

भारतीय जनता पार्टी… मागील काही वर्षांत या पक्षाने आपला दबदबा संपूर्ण देशात वाढवला आहे. देशात भाजपची सत्ता आहे. तर महाराष्ट्रात सत्ता नसली तरी देखील भाजप आजही नंबर 1 पक्ष आहे. सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेला पक्ष म्हणजे भाजप. पण तीन जणांच्या गुणांची बेरीज झाल्याने भाजपचे सत्तेचे ‘गणित’ थोडक्यात चुकले. त्यामुळे भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. विरोधी बाकावर बसूनही, भाजप आजही सरकारला सळो की पळो करुन सोडत आहे. पुढच्या निवडणुकीत एक हाती सत्ता राज्यात मिळावी यासाठी भाजपने आतापासून तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यासाठी भाजपने घर-घर झेंडा अभियान राबवले.

फडकवले २ लाख झेंडे

विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजपची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न होत आहे. आता भाजप स्थापना दिवसाचे औचित्य साधत भाजपने प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरावर भाजपचा झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपने संपूर्ण राज्यात २ लाख ७१ हजार १६० कार्यकर्त्यांच्या घरी भाजपचे झेंडे लावले. खरं तर ही कौतुकाची बाब आहे. पण राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपकडे इतकेच कार्यकर्ते आहेत का? असा सवालही उपस्थित होत आहे.

(हेही वाचाः म्हणून, पंढरपुरात मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा!)

म्हणून भाजपचे घर-घर झेंडा अभियान

शिवसेनेने राज्यात भाजपशी फारकत घेतली आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही सत्तेपासून वंचित राहावे लागले. मात्र आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम वाढावा यासाठी भाजप विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. एवढेच नाही तर राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती बघता हे सरकार कधीही पडेल आणि राज्यात निवडणुका लागतील, असे भाजपला वाटत आहे. त्यामुळे आतापासून भाजपचे नेते तयारीला लागले असून, घर-घर झेंडाच्या माध्यमातून भाजप सर्वसामान्य लोकांपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

ऑनलाईन मीटिंगवर भर

विशेष बाब म्हणजे भाजपने आपल्या व्हर्च्युअल बैठकांवर देखील भर दिला आहे. नुकत्याच भाजपने १ हजार ३६६ व्हर्च्युअल मीटिंग घेतल्या आहेत. यामध्ये ग्रामीण भागात काय वातावरण आहे याचा आढावा घेऊन पक्षाचे काम कसे सुरू आहे, याची माहिती देखील घेण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here