शुक्रवारी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला असून महाविकास आघाडीचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्याला विशेष तरतूद केली आहे. यंदा आरोग्य सेवांसाठी ११ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी अजित पवारांनी आरोग्य संदर्भात विविध घोषणा केल्या आहेत. कोरोनाने जेंव्हा आपल्या आरोग्यासमोर मोठे संकट निर्माण केले तेंव्हा राज्यातील जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी शासनाने मोठ्याप्रमाणात आरोग्य सुविधांचे निर्माण केले. हीच व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे, आरोग्य सेवांचा दर्जात्मक विस्तार करण्याचे नियोजनही अर्थसंकल्पात करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Maharashtra budget 2022 : ‘लालपरी’ला पुन्हा जीवंत करण्याचा निर्धार )
आरोग्य योजनांसाठी या झाल्या घोषणा
- राज्यात नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा येथे ५० खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिटची स्थापन करण्यासाठी भांडवली खर्चाकरिता १०० कोटी रुपये आणि आवरती खर्चासाठी ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
- ग्रामीण भागातील गरिब रुग्णांना शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रियेविना कडनी स्टॉन काढण्यासाठी लिथो ट्रिप्सी उपचार पद्धती उपलब्ध करून देण्याचा निर्णय
- २०० खाट्यांच्या सर्व रुग्णालयांमध्ये येत्या ३ वर्षात ही उपचार पद्धत सुरू करण्याची प्रस्तावित असून त्याकरता यावर्षी १७ कोटी ६० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित
- मोती बिंदू शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात आधुनिक फेको उपचार पद्धतीने शासनाकडून सुरू करण्याचा निर्णय, यामध्ये एकूण ६० रुग्णालयात ही उपचार पद्धती सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
- राज्यातील ५० खाट्यांपेक्षा अधिक क्षमता असणाऱ्या रुग्णालयांना यांत्रिक धुलाई सयंत्रे आणि ३० खाटांवरील रुग्णालयांना स्वच्छता सयंत्रे देण्यात येणार
- कर्क रोगाचे वेळेत आणि जलद निदान आणि उपचाराच्या उद्देशाने ८ आरोग्य मंडळासाठी ८ मोबाईल कर्करोग निदान वाहनांची सुविधा उपलब्ध, त्यासाठी ८ कोटी खर्च अपेक्षित आहे.
- जालना येथे ३६५ खाटांचे नवीन प्रादेशिक मनोरूग्णालय स्थापन, या रुग्णालयाच्या बांधकामासाठी अंदाजे ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित
- प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलीमेडिसीन केंद्र स्थापन करण्यात येणार, २०२२-२३ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरीता सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाला ३ हजार १८३ कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित