Maharashtra Budget 2023: कफ सिरफ तयार करणाऱ्या २७ कंपन्या चौकशीच्या फेऱ्यात; संजय राठोडांची माहिती

142

राज्य शासनाच्या औषध प्रशासन विभागातर्फे कफ सिरफ तयार करणाऱ्या ८४ कंपन्यांची तपासणी करण्यात आली असून १७ दोषी कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून ४ कंपन्यांचे उत्पादन बंद तर ६ कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिली.

देशातून निर्यात झालेल्या सदोष कफसीरपमधील हानीकारक घटकद्रव्यांमुळे ६६ मुलांचा मृत्यू झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने निदर्शनास आणून दिली. त्यानंतर राज्यात तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या औषधाच्या गुणवत्ता तपासण्या (स्टॅबिलिटी स्टेट) झाल्यानंतरच जागतिक बाजारपेठेत पाठवणे बंधनकारक असताना राज्यातील २०० औषध उत्पादकांकडून तयार करण्यात येणारी २००० पेक्षा अधिक औषधे कोणत्याही प्रकारच्या स्थिरता चाचणी प्रमाणपत्र न घेताच निर्यात होत असल्याचे फेब्रुवारी, २०२३ मध्ये आढळून आले.

त्यामुळे राज्यातील या २०० औषध उत्पादकांची सखोल चौकशी करून त्यांचे परवाने रद्द करून कारवाई करण्याची मागणी करीत भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थितीत केली होती. ही घटना गंभीर असून या प्रकरणी सदर कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली.

याबाबत उत्तर देताना मंत्री संजय राठोड यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना यांनी गांबियामधील ६६ मुलांच्या मृत्युवरून ऑक्टोबर २०२२ मध्ये अलर्ट जारी केला होता. त्याअनुषंगे अन्न व औषध प्रशासनाच्या ७ नोव्हेंबर २०२२ परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यातील लिक्वीड ओरल उत्पादन करणाऱ्या उत्पादकांची, अन्न औषध प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटना यांनी गांबियामधील मुलांच्या मृत्युवरून जारी केलेल्या बातमीच्या अनुषंगाने तपासणी मोहिम हाती घेतली होती. यामध्ये ८४ कंपन्यांची तपासणी करण्यात आली. ज्या उत्पादकाकडे स्थिरता चाचणीमध्ये त्रुटी आढळून आले आहेत अशा एकूण २७ कंपन्या आढळून आल्या आहेत. त्यांचे विरुद्ध आवश्यक कारवाई करण्यात येत आहे.

(हेही वाचा – अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर: मानधनात होणार २० टक्क्यांची वाढ)

राज्यात एकूण ९९६ अॅलोपॅथिक उत्पादक असून त्यापैकी ५१४ उत्पादक निर्यात करतात. तसेच गेल्या वर्षभरात ८ हजार २५९ किरकोळ विक्रेत्यांची ही तपासणी करण्यात आली असून २ हजार परवाना धारकांना कारणे दाखवा तर ४२४ परवाने रद्द तर ५६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. तसेच हा विषय गंभीर असून याबाबत लवकरच एक बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही ही मंत्र्यांनी दिली. या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह आमदार योगेश सागर, जयकुमार रावळ यांनी भाग घेतला. या प्रकरणी तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सुद्धा हा विषय गंभीर असून याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे निर्देश दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.