नार्वेकरांच्या त्या चुकीबाबत बोलताना शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘त्यांच्या आमदारकीचा रस्ता शिंदे गटातून’

167

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी, २७ फेब्रुवारीला राज्यपालांच्या अभिभाषणापासून सुरुवात झाली. शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात येऊन बसले. यावेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ही चूक नार्वेकरांच्या लक्षात आणून दिली आणि त्यानंतर नार्वेकर बाहेर गेले. प्रेक्षागृहाची गॅलरी समजून ते आत जाऊन बसल्याचे सांगितले. पण सुरक्षारक्षकांनी नार्वेकरांना सभागृहात कसे सोडले? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. ‘नार्वेकर हे आमच्या संपर्कात असून त्यांच्या आमदारकीचा रस्ता शिंदे गटातूनच जातो,’ असा दावा शिरसाट यांनी आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

प्रसार माध्यमांसोबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, ‘आमच्या संपर्कात मिलिंद नार्वेकर आहेत. त्यांना आता विधिमंडळात येण्याची घाई झालेली दिसतेय. तसेच उद्धव ठाकरेही त्यांना जवळ करत नसल्यामुळे अशा परिस्थितीत नार्वेकरांच्या आमदारकीचा मार्ग फक्त शिंदे गटातूनच जातो. त्यामुळे आता न्यायालयाच्या निकालानंतर आमच्याकडे किती इनकमिंग होईल, हे लवकरच सगळ्यांना कळणार आहे.’

पुढे शिरसाट म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर अनेकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता आपले काय होईल? असे वाटत आहे. पहिल्यांदा त्यांना असे वाटत होते की, यांच्यावर (शिंदे गटावर) कारवाई होईल, आता त्यांना जाणीव झाली आहे, आपल्यावर कारवाई होणार आहे. म्हणून त्यांच्यातील अस्थिरता, अस्वस्थता जाणवायला लागली आहे. पण आता ते (ठाकरे गट) आमच्यासोबत येतील हे निश्चितीच आहे.’

(हेही वाचा – Maharashtra Budget Session : मिलिंद नार्वेकर चुकले, थेट आमदारांच्या आसनावर येऊन बसले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.