भाजपा ही भ्रष्टाचाराची वॉशिंग मशीन आहे. त्या पक्षात गेल्यावर नेत्यांचे सगळे डाग धुऊन जातात, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. त्याची कबुली भाजपाच्याच एका आमदाराने दिली आहे. भाजपाचे आमदार रमेश पाटील विधानपरिषदेत बोलताना म्हणाले, ‘आमच्याकडे गुजरातहून निरमा पावडर येते, ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो.’ खुद्द भाजपाच्या आमदाराने असे खळबळजनक विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ठाकरे गटाने नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याबाबत बोलताना रमेश पाटील म्हणाले की, आमच्याकडे गुजरातहून निरमा पावडर येते. ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो. आमच्याकडे न्याय मिळतो म्हणून भूषण देसाई यांचा पक्षप्रवेश झाला आहे. रमेश पाटील यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
चूक लक्षात आल्यावर रमेश पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरुन यू टर्न घेण्याचा प्रयत्न केला. गुजरातमध्ये तयार होणाऱ्या निरमा पावडरबद्दल मी बोलत होतो. भूषण देसाई भाजपामध्ये आले तर ते का आले? या प्रश्नावर मी बोलत होतो. भूषण देसाई यांच्यावर आम्ही कोणताही दबाव टाकलेला नाही किंवा त्यांना आम्ही बोलावलेले नाही, अशी सारवासारव त्यांनी केली.
म्हणाले, शिवसेनेऐवजी भाजपात प्रवेश
भूषण देसाई यांना असे वाटले असेल की, भाजपा ही काम करणारी, न्याय देणारी पार्टी आहे. म्हणून त्यांना पक्षांमध्ये यावे असे वाटले असेल, म्हणून ते आले आहेत, असेही रमेश पाटील यांनी सांगितले. परंतु, यावेळी काहीसे गोंधळलेले दिसले. भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला असतानाही रमेश पाटील अनेकदा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे म्हणत होते.
(हेही वाचा – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कृषिमंत्री अकलेचे तारे तोडत असताना मुख्यमंत्री गप्प का? अजित पवार यांचा सवाल)
Join Our WhatsApp Community