कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून, नाफेडकडून कांदा खरेदी सुरू झाली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी विधानसभेत बोलताना सांगितले.
शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा मंगळवारी, दुसऱ्या दिवशी कांदा, कापसाच्या पडलेल्या भावामुळे विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतल्याचे दिसत आहे. यासंदर्भात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार आंदोलन केल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात इतर सर्व मुद्दे सोडून फक्त कांदा, कापूस, तूर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येवर चर्चा करण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात नाफेडने कांदा खरेदी सुरू केल्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले की, ‘हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे. नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती, त्याप्रमाणे खरेदी सुरू झाली आहे. २.३८ लाख मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाला आहे. तसेच जिथे खरेदी केंद्र बंद असेल तिथे सुरू करण्यात येईल. कांदा निर्यातीवर देखील बंदी नाही. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना सुद्धा आवश्यकतेनुसार मदत जाहीर करण्यात येईल,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.
(हेही वाचा – अर्थसंकल्पीय अधिवेशन: विरोधक विधान भवनाच्या पाय-यांवर आक्रमक, कांद्यांसह कापसाला हमीभाव देण्याची मागणी)