संजय राऊतांच्या अटकेच्या मागणीसाठी गदारोळ; विधानसभा आणि विधानपरिषद दिवसभरासाठी तहकूब

154
विधिमंडळाला ‘चोर’ म्हणणाऱ्या संजय राऊत यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी करीत सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घातल्याने विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज बुधवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
राज्यसभा खासदार संजय राऊतांनी बुधवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना, ‘राज्यात विधिमंडळ नाही, तर चोरमंडळ आहे’, अशी टीका केली होती. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. याविरोधात शिंदे गट-भाजपाने आक्रमक भूमिका घेत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हक्कभंग दाखल केला. विधानसभेत आमदार अतुल भातखळकर आणि विधानपरिषदेत आमदार राम शिंदे यांनी अनुक्रमे अध्यक्ष आणि सभापतींना यासंदर्भातील पत्र दिले.
सत्ताधारी पक्षाचे आमदार आक्रमक झाल्यामुळे विरोधकांनाही संजय राऊतांच्या वक्तव्यावर असहमती दर्शवावी लागली. विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, ‘संजय राऊत यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले असले, तर ते अतिशय चुकीचे आहे. त्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु, त्याआधी ते वक्तव्य तपासून पाहिले पाहिजे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.

उद्धवसेनेची कोंडी

संजय राऊत यांच्या वक्त्यव्यानंतर सत्ताधारी आमदार आक्रमक झाले, तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी मवाळ भूमिका घेतली. त्यामुळे १५ आमदारांचे संख्याबळ असलेल्या उद्धवसेनेची विधानसभेत पुरती कोंडी झाली. सत्ताधाऱ्यांच्या गदारोळात त्यांना आपली भूमिकाही मांडता आली नाही.

…तर उद्धव ठाकरेही चोर -फडणवीस

संजय राऊत यांनी केलेला आरोप हा सत्तापक्षावर नसून, संपूर्ण विधिमंडळावर आहे. यशवंतराव चव्हाणांपासून मोठमोठे नेते या विधिमंडळाने पाहिले. देशातील सर्वोत्तम विधिमंडळ म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. त्यामुळे या विधानमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार कुणाला दिला, तर ते योग्य ठरणार नाही. कारण उद्या या विधानमंडळाला कोणी उठसुठ काहीही म्हणतील. आज जर कारवाई झाली नाही, तर यापुढे रोज एक संजय राऊत उठून विधिमंडळाचा अवमान करतील. संजय राऊत यांच्या मते विधिमंडळ चोर असेल, तर त्यांचे सर्वोच्च नेते उद्धव ठाकरेही चोर मंडळाचे सभासद ठरतात, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली.
आम्ही संजय राऊतांच्या विधानाचे समर्थन केलेले नाही. फक्त इतकीच मागणी आहे, की त्यांचे विधान एकदा तपासून पहावे. त्यानंतर पुढचे पाऊल उचलावे. – अंबादास दानवे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांना देशद्रोही म्हटले होते. त्याचीही नोंद सभापतींनी घ्यावी. याप्रकरणी आम्ही जो हक्कभंग आणणार आहोत, तो दाखल करून घ्यावा. तसेच संजय राऊत यांच्यावर कारवाई करताना याबाबतीतही तोच निकष लावण्यात यावा.
 – अनिल परब, आमदार उद्धवसेना
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.