ईडी आहे की घरगडी? मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला 

155

भाजप बदनामी करताना कुठल्याही थराला जात आहे. नवाब मलिकांवर आरोप झाले. सिद्ध झाल्यावर बघू त्यांचे काय करायचे. पण तुम्ही ज्याप्रकारे आरोप करत आहेत, हे पाहता ते नवाब मलिक दाऊदचा हस्तक असल्याचे दाखवून त्यांची प्रतिमा मलिन करायची. केंद्राच्या यंत्रणांना थाळ्या वाजवा, दिवे लावा हेच करता येते का? इतकी वर्ष मलिक निवडून येत होते. तेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांना हे दिसले नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांना काहीच माहिती नाही का? माहिती तुम्हीच द्यायची, चौकशी तुम्हीच करायची मग ईडी करतेय काय? ईडी आहे की घरगडी हेच कळत नाही. सगळ्या यंत्रणांचा गैरवापर केला जातो. पण आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिकांच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले.

दाऊदच्या घरात घुसून मारण्याची हिंमत दाखवा

आधी रामाच्या नावाने मते मागितली आता दाऊदच्या नावाने मते मागणार का? दाऊदला फरफटत आणू असे गोपीनाथ मुंडे म्हणाले होते. पण आता आपणच दाऊदच्या मागे फरफटत चाललो आहे. ओबामाने ओसामाच्या नावाने मते मागितली का? ओबामांनी घरात घुसून लादेनला मारले. दाऊदच्या घरात घुसून त्याला मारणे याला हिंमत म्हणतात, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, देशद्रोह्यांच्या विरोधात आम्ही आहोतच परंतु नवाब मलिकांचा राजीनामा तुम्ही मागता? पण काश्मीरात मेहबुबा मुफ्तीसोबत सरकारमध्ये तुम्ही बसला होता. ज्याने लोकसभेवर हल्ला केला त्या अफजल गुरूला फाशी देऊ नका असे मुफ्ती म्हणाल्या होत्या. या विचारांची माणसे तुम्हाला माहिती असताना तुम्ही त्यांच्यासोबत सरकारमध्ये बसला.

(हेही वाचा आता नितेश राणेंचा पेनड्राईव्ह! कोणता केला गौप्यस्फोट?)

सत्तेसाठी मी बदलणार नाही

मी कडवट हिंदुत्ववादी आहे आणि राहणार, माझे विचार बदलले नाही. सत्तेसाठी मी बदलणार नाही. मुझफ्फर लांबेचा माहिमच्या दर्ग्यातील अनेक क्रांतीकारकांसोबत फोटो हवा. माझा फोटो कुणासोबत दाखवला म्हणजे तो आपल्या संबंधीचा आहे असे होत नाही. मुझफ्फर लांबे यांच्या नियुक्ती तत्कालीन भाजपा सरकारच्या काळात केली आहे. नुसता आरोप करून राज्य चालू शकत नाही. एखाद्याला वाईट आहे हे सांगण्याआधी तू किती चांगला आहे हे सांगावे लागते. दुसऱ्यांवर आरोप करताना स्वत: काय केले हे पण पाहावे लागते, असेही उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.