उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर हे राज्यपालांच्या अभिभाषणावेळी काहीसे गडबडल्याचे दिसून आले. दर्शक गॅलरीमध्ये बसण्याऐवजी सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश करीत ते आमदारांच्या आसनावर येऊन बसले. त्यानंतर विधिमंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देत बाहेर जाण्याची विनंती केली.
सोमवार, २७ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता राज्यपाल रमेश बैस सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले. राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरुवात झाल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे आपल्या सहयोगी आमदारांसह सेंट्रल हॉलमध्ये पोहोचले. यावेळी त्यांच्या समवेत उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना सदस्यांव्यतिरिक्त (आमदार) अन्य व्यक्तींना सेंट्रल हॉलमध्ये बसायची परवानगी नाही. तरीही नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये येऊन आमदारांच्या आसनांवर बसले. ही बाब सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या आमदार सचिन अहिर यांनी नार्वेकर यांना इशारा करीत दर्शक गॅलरीत बसण्यास सांगितले. त्यानंतर नार्वेकर यांनी सेंट्रल हॉलमधून काढता पाय घेतला.
मिलिंद नार्वेकर म्हणतात…
प्रेक्षक गॅलरी समजून मी चुकून सेंट्रल हॉलमध्ये जाऊन बसलो. चूक लक्षात आल्यावर लगेच बाहेर पडलो, असे स्पष्टीकरण मिलिंद नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
Join Our WhatsApp Community