रवी राणांच्या वक्तव्यानंतर जाहीर नाराजी व्यक्त करीत जोरदार शक्तिप्रदर्शन करणाऱ्या बच्चू कडू यांना शिंदे-फडणवीस सरकारने ५०० कोटींचे गिफ्ट दिले आहे. त्यामुळे कडू यांचे शक्तिप्रदर्शन फळाला आल्याच्या चर्चा आहेत.
( हेही वाचा : Ind Vs Ban: टी-20 विश्वचषकात भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा, बांग्लादेशवर थरारक विजय)
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अमरावती जिल्ह्यातील सपन मध्यम प्रकल्पाला ४९५.२९ कोटींची सुधारित मान्यता देण्यात आली. त्यामुळे ६ हजार १३४ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर तडीस लावण्यासाठी प्रहार जनशक्तीचे नेते आमदार बच्चू कडू प्रयत्नशील होते.
रवी राणा यांनी खोके घेतल्याचा आरोप केल्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शिवाय खोके घेतल्याचे पुरावे सादर न केल्यास ८ आमदारांसह वेगळा निर्णय घेण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर स्वत: मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मध्यस्थी करीत हा वाद शमवला. आता बच्चू कडू यांच्या मतदारसंघात ५०० कोटी रुपयांचा निधी देऊन त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
- ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत अनुसूचित क्षेत्राबाहेरील गावांमध्येही विकास कामांसाठी निधी देणार
- अमरावती जिल्ह्यातील सपन मध्यम प्रकल्प ४९५.२९ कोटींची सुधारीत मान्यता. ६ हजार १३४ हेक्टर क्षेत्राला त्यामुळे सिंचनाचा लाभ मिळेल.
- राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनच्या चौथ्या टप्प्यास मान्यता.