मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा रखडलेला आणि बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी राजभवनात झाला. यावेळी शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिमंडळ आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. या शपथ विधीनंतर नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे शिक्षण, त्यांच्यावर असलेले आरोप त्यांची संपत्ती किती आहे, याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.
(हेही वाचा – माझा मुलगा LLB करतोय तरी त्याचं नाव TET घोटाळ्याच्या यादीत कसं? सत्तारांचा सवाल)
मिळालेल्या माहितीनुसार, या शपथविधी झालेल्या १८ मंत्र्यांपैकी ७० टक्के मंत्र्यांवर राजकीय आणि अपराधी स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. तर १२ कॅबिनेट मंत्री असे आहेत ज्यांच्यावर अपराधी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. नव्या मंत्रिमंडळातील एक मंत्री १० वी पास तर पाच मंत्री १२ वी पास आहेत. यासह १ इंजिनिअर, ७ पदवीधर, २ पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. तर एकाने डॉक्टरेट मिळविलेले आहे. यासर्वांमध्ये उच्च विद्याविभूषित असलेले भाजपचे मीरजचे आमदार सुरेश खाडे हे असून हे सगळेच मंत्री कोट्याधीश असल्याचे सांगितले जात आहे.
मंत्रिमंडळात शपथ घेतलेले सर्वच मंत्री कोट्यधीश असून सर्वाधिक संपत्ती ही मलबार हिलचे भाजपचे आमदार आणि नव्यानेच मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंगलप्रभात लोढांच्या नावावर आहेत. निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मंगलप्रभात लोढा यांच्याकडे ४४१ कोटी रूपयांची संपत्ती असून २५२ कोटी रुपयांची चल तर १८९ कोटी रुपयांची अचल संपत्ती त्यांच्याकडे आहे. तर दोन कोटी संपत्ती असलेले संदीपान भुमरे हे या मंत्रिमंडळातील सर्वात गरीब मंत्री आहेत. भुमरे हे पैठणचे आमदार असून गेल्या ३५ वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत. तसेच तानाजी सावंत हे संपत्तीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्याकडे ११५ कोटींची संपत्ती आहे. तानाजी सावंत हे शिंदे गटातील आमदार आहेत. तर तिसऱ्या स्थानी शिंदे गटाचे प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळणारे दिपक केसरकर असून त्यांच्याकडे ८२ कोटींची संपत्ती आहे.
- विजय गावित, भाजपा – २७ कोटी
- गिरीश महाजन, भाजपा – २५ कोटी
- राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा – २४ कोटी
- अतुल सावे, भाजपा – २२ कोटी
- अब्दुल सत्तार, शिंदे गट – २० कोटी
- शंभूराजे देसाई – शिंदे गट -१४ कोटी
- सुधीर मुनगंटीवार, भाजपा – ११.४ कोटी
- दादा भुसे – १० कोटी