महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार पुढच्या आठवड्यात होण्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. यासाठी फॉर्म्युलाही ठरला आहे. यात एकनाथ शिंदे यांच्या गटाला १५ ते १६ मंत्रीपदे मिळतील, अशी शक्यता आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी, २८ जुलै रोजी रात्री दीड वाजता दिल्लीला जाऊन त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय झाला आहे, अशी माहिती आहे. भाजपाकडे अपक्षांसह ११३ आमदारांचे पाठबळ आहे. तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत ५० आमदार आहेत. राज्य सरकार स्थापन होऊन देखील मंत्रिमंडळ विस्तारात दोन्ही गटांना किती मंत्रीपदे मिळणार याबाबत साशंकता होती. भाजपाला २४ ते २५ मंत्रिपदे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला १५ ते १६ मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
अपक्षांना मंत्रिपदे मिळणार?
एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना देखील मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ८ ते ९ अपक्ष आमदार आहेत. तर, भाजपासोबत देखील ५ ते ६ अपक्ष आमदार आहेत. उद्वव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या ९ मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. एकनाथ शिंदे यांच्यासह संदिपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, बच्चू कडू, राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात भूमिका घेतली होती. या नेत्यांना शिंदे गटातून पुन्हा संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community