शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लांबत चालल्याने आमदारांच्या गोटात प्रचंड अस्वस्थता आहे. ही बाब लक्षात घेऊन शिंदे-फडणवीसांनी लवकरात लवकर विस्तार करण्याचे ठरविले असून, संभाव्य मंत्र्यांची प्रारूप यादी निश्चित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी शिंदे गटातील आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
( हेही वाचा : लटकेंच्या विजयाचा आनंदोत्सव, पण अपक्षांसह नोटाला मिळालेल्या मतांमुळे विचार मंथन करण्याची गरज!)
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाकडून ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी अनेकजण नाराज झाल्याने पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात सामावून घेण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. सध्याच्या सूत्रानुसार भाजपा आणि शिंदे गटाला प्रत्येकी ११ मंत्रीपदे मिळणार आहेत. मात्र, इच्छुकांची संख्या अधिक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
प्राप्त परिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेले ४० आणि १० अपक्ष आमदार आहेत. त्यापैकी जास्तीत जास्त २० आमदारांना मंत्रीपद दिले जाऊ शकते. त्यामुळे उर्वरितांना शांत कसे करायचे, असा पेच शिंदे यांच्यासमोर आहे. त्यांना महामंडळांत सामावून घेण्याच्या दृष्टीकोनातून नियोजन सुरू आहे.
…हे आमदार इच्छुक
- ठाण्यातून प्रताप सरनाईक इच्छुक आहेत. परंतु, त्यांच्या भोवतालचा ईडीचा फेरा अद्याप सुटलेला नाही. शिवाय शिंदे यांच्याशी सख्य नसल्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत साशंकता अधिक आहे.
- माजी मंत्री रामदास कदम आपल्या पुत्रासाठी आग्रही आहे. योगेश कदम यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे, यासाठी त्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केल्याचे कळते.
- रायगडमधून भरत गोगावले यांचे नाव आघाडीवर असले, तरी अन्य दोघा आमदारांची मंत्रीपदाची इच्छा लपून राहीलेली नाही.
- कोल्हापूरच्या प्रकाश आबिटकर यांच्या मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावरच्या फेऱ्या गेल्या काही दिवसांपासून वाढल्या असून, राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मात देण्याच्या तयारीत ते असल्याचे बोलले जात आहे.
- जळगावमध्ये चिमणराव पाटील आणि किशोर पाटील यांच्यात रस्सीखेच आहे. परंतु, गुलाबराव पाटील एकाचाही नंबर लागू देणार नाहीत, अशा चर्चा आहेत.
- बुलढाण्यातून संजय रायमुलकर आणि संजय गायकवाड फेटा बांधून तयार आहेत. शिवाय संतोष बांगरही राज्यमंत्री पदासाठी आग्रही असून, नांदेडच्या बालाजी कल्याणकर यांच्याऐवजी आपल्याला मंत्रीपद मिळावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.