‘मी माझा मुक्काम ‘वर्षा’वरुन मातोश्रीवर हलवत आहे’, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर आता शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील 46 आमदारांचा गट असल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या पदाचा राजीनामा देऊन, महाविकास आघाडी सरकार कोसळणार का, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याच संदर्भात बुधवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोरांना आवाहन केले आहे.

तुम्हाला जर मी मुख्यमंत्रीपदी नको असेन तर मला समोर येऊन सांगा, मी माझा राजीनामा द्यायला तयार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

…तर मी माझा राजीनामा देतो

काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मला सांगण्यात आम्हाला मुख्यमंत्रीपदी आम्हाला उद्धव ठाकरे नको असे म्हटले असते तर मला काही वाटलं नसतं. पण शरद पवार आणि कमलनाथ यांनी फोन करुन ते माझ्यासोबत असल्याचे सांगितले. पण माझ्याच पक्षातल्या माझ्या माणसांना मी नको असेन तर मग काय करायचं? माझ्या लोकांना जर मी मुख्यमंत्रीपदी नको असेन तर त्यांनी ते सुरत आणि इतर ठिकाणी जाऊन बोलण्यापेक्षा मला समोर येऊन सांगायचं होतं. त्यांच्यापैकी एकाही आमदाराने मला सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्रीपदी नको, तर मी आता माझा राजीनामा द्यायला तयार आहे. यावर जर कोणाचा विश्वास नसेल तर आज संध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीला हलवत आहे.

या आणि राजीनामा घेऊन जा

मला सत्तेची लालसा नाही, मला खुर्चीला चिकटून बसायचं नाही. मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे, त्यामुळे मला कुठलाही मोह खेचू शकत नाही. माझ्याशिवाय इतर कोणीही शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तरी मला आनंद आहे, पण हे मला समोर येऊन सांगा,असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आज मी माझं राजीनामा पत्र तयार करुन ठेवत आहे, ते तुमच्या हातात देतो ते तुम्ही राज्यपालांकडे घेऊन जा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here