तब्बल १२ वेळा उत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळवणाऱ्या महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात नाकारण्यात आला होता. मात्र, वने आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्राशी चर्चा करीत महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या समावेशाची मागणी केली. ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
( हेही वाचा : ३१ डिसेंबरला लोणावळ्याला जाताय? तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती… )
भारतीय संस्कृतीचे विविधांगी दर्शन घडवण्यासाठी दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला नवी दिल्ली येथे विविध राज्यांचे चित्ररथ सादर केले जातात. त्यासाठी राज्यांकडून प्रस्ताव आणि नमुने मागवले जातात. त्यानंतर छाननी करून ठराविक संख्येत राज्यांची निवड केली जाते. यंदा महाराष्ट्राला निमंत्रण न दिल्याने आपल्या चित्ररथाच्या समावेशाची शक्यता कमी होती. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती.
वने आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याची दखल घेत, बुधवारी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दिल्लीत सूत्रे हलली आणि शुक्रवारी दुपारी महाराष्ट्राचा चित्ररथ स्वीकारल्याचा निरोप आल्याची माहिती त्यांनी दिली.
आतापर्यंत ३८ वेळा सहभाग
१९७१ ते २०२२ या ५१ वर्षांच्या काळात महाराष्ट्राने ३८ वेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन घडवले आहे. यासाठी आपल्याला १२ वेळा उत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कारही मिळाला आहे.
Join Our WhatsApp Community