शिव संग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे 14 ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या अपघातानंतर पोलिसांनी मेटेंच्या कारचालकाला ताब्यात घेतले होते. या प्रकरणी आता विनायक मेटेंच्या कारचालकावर सीआयडीकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकरच मोठी माहिती समोर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कारचालकाविरोधात गुन्हा दाखल
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाला होता. यामध्ये मेटेंचे अपघाती निधन झाले. मात्र, मेटे यांच्या मृत्यूनंतर काही नेत्यांनी या अपघाताबाबत शंका उपस्थित केली होती. अपघातात बचावलेला कारचालक एकनाथ कदम याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदोशानंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले होते. सीआयडीने कारचालकाची चौकशी केल्यानंतर त्याच्यावर रसायनी पोलिस स्थानकात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
(हेही वाचाः ‘खटले न चालवता भर चौकात फासावर लटकवा’, श्रद्धा हत्याकांडाबाबत राऊतांची संतप्त प्रतिक्रिया)
सीआयडीच्या तपासात माहिती समोर
सीआयडीने महामार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. तसेच याबाबत काही तज्ज्ञांची समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी देखील सीबीआयकडून करण्यात आली आहे. कारचालक एकनाथ कदम हा सातत्याने 120 ते 140 किमी.च्या वेगाने गाडी चालवत होता. तसेच अपघाताच्या काही वेळ आधी दुस-या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर हा अपघात झाल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळेच सीआयडीने कारचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
Join Our WhatsApp Community