मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे सातत्याने दिल्ली वा-या करत आहेत. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचं घोंगडं भिजत पडल्यामुळे मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करत असल्याचे बोलले जात आहे. शनिवारी देखील राज्याच्या दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपला दौरा रद्द करत दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे.
मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब?
राज्यातील न भूतो न भविष्यति अशा सत्तांतराला एक महिना झाला आहे. या एका महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल सहा वेळा दिल्ली गाठली आहे. सरकार स्थापन होऊन एक महिना झाला पण अजूनही मंत्रिमंडळाचा पत्ता नसल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांचा हा तातडीचा दिल्ली दौरा महत्वपूर्ण मानला जात असून यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर आणि विस्ताराच्या तारखेवर शिक्कामोर्तब होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचाः ‘आनंद दिघेंबाबत जे झालं त्याचा मी साक्षीदार, वेळ आल्यावर बोलणार!’ मुख्यमंत्र्यांचा इशारा)
जेव्हा माझी मुलाखत होईल तेव्हा…
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपल्या महाराष्ट्र दौ-यात शनिवारी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आज मी जाहीरपणे काही गोष्टी बोलणार नाही. पण योग्य वेळ आली की नक्कीच बोलेन. आता काही लोकांनी मुलाखतींचा सपाटा सुरू केला आहे. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्यावेळी केवळ राज्यात नाही तर देशात मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही, असे विधान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे.
Join Our WhatsApp Community