गद्दार कौन और खुद्दार कौन? ये पब्लिक हैं, ये सब जानती है…

120

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची सभा एकाच दिवशी पार पडली. अनेक दिवसांनंतर उद्धव ठाकरे फॉर्ममध्ये दिसले. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरे गट कोलमडून पडतो की काय असं वाटत होतं पण ठाकरे मात्र आता लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. संजय राऊत हे तुरुंगात आहेत. कदाचित महानगरपालिकेच्या निवडणूकीला ते गैरहजर असतील. परंतु उद्धव ठाकरे यांनी आपली सेक्युलर रणनिती आखली आहे. सुषमा अंधारे संजय राऊत यांची जागा घेऊ शकतात, अशी शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे.

शिवसेना जवळजवळ तीन दशकं मुंबईवर राज्य करतेय, महापालिकेवर त्यांची सत्ता आहे. पण शिवसेनेच्या राज्यात मुंबईचा म्हणावा तसा विकास झाला नाही. केवळ बळजबरी बिल्डिंग्स उभ्या केल्याने विकास होत नाही. मुंबईतल्या रस्त्यांची आणि शौचालयांची अवस्था बिकट आहे. रस्त्यावरील कचर्‍याचे नियोजन होत नाही आणि लोकसंख्या वाढत आहे. यामुळे ऍंटि-इनकम्बन्सीचा फटका शिवसेनेला बसेल यात वाद नाही.

आता पाहायचे आहे की, शिवसेना-संभाजी ब्रिगेड-राष्ट्रवादी अशी आघाडी होते का आणि यामध्ये कॉंग्रेसची काय भूमिका असू शकते. कदाचित मुस्लिम पक्षांना देखील सामावून घेण्याच प्रयत्न केला जाईल. खरं पाहता ही लढाई ठाकरे – शिंदे अशी होणार आहे. कारण शिंदेंना आपलं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर मुंबई आणि ठाणे पालिकेवर झेंडा फडकवावा लागणार आहे. उद्धव ठाकरे यांची देखील तीच अवस्था आहे. आपणंच बाळासाहेबांचे खरे वारसदार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा असणार आहे. ही निवडणूक ठाकरे आणि शिंदे या दोघांसाठी अतिशय महत्वाची आहे.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टिका केली. ठाकरेंनी सभा गाजवली हे सत्य आहे. पण एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन सर्व आरोपांना उत्तम उत्तरे दिले आहेत. पक्षात मालक कुणीच नसतो. ही काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, असं शिंदेंनी म्हटलं. ’पार्टी के कार्यकर्ता को नौकर समझोगे तो कोई कार्यकर्ता बरदाश्त नही करेगा.” यामुळे शिंदे उत्तम हिंदी बोलू शकतात हेही जनतेला कळलं. उद्धव ठाकरेंनी शिंदेंना मिंध्ये म्हटलं, तर यावर उत्तर देताना “आम्ही मिंधे नाही तर बाळासाहेबांचे ’खंदे लढवैये आहोत” असं म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक टिकेला उत्तर त्यांनी दिलं आहे. महत्वाचं म्हणजे त्यांनी टिका करताना उद्धव ठाकरे यांचा अपमान केला नाही. टिका करताना एकप्राकरचं भान ठेवायला हवं आणि ते भान शिंदेंकडे आहे.

आता महानगरपालिकेच्या महायुद्धात काय होईल, हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे. ठाकरेंचं प्रचंड नुकसान झालं असलं तरी ते दुर्योधनाच्या जिद्दीने लढणार आहेत. पण जनता आता गाफील राहणार नाही हे मात्र खरं. एकनाथ शिंदे यांच्या भाषेत सांगायचं तर, “गद्दार कौन और खुद्दार कौन? ये पब्लिक हैं ये सब जानती है.”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.