मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यानंतर सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेत्यांकडून शिंदे गटावर निशाणा साधण्यात येत आहे. सामनाला दिलेल्या विशेष मुलाखतीत देखील उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर घणाघाती टीका केली आहे. त्याला आता मुख्यमंत्री शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
त्यांना अजून काही बोलायचं असेल ते बोलू द्या
वादळात पालापाचोळा उडत आहे तो बसला की खरं चित्र लोकांसमोर येईल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली होती. त्याला उत्तर देताना, त्यांना अजून जे काही बोलायचे आहे ते बोलू द्या, मग एकत्रित आम्ही जे बोलायचं बोलू. त्यांना जर का वाटत असेल आम्ही पालापाचोळा आहोत, तर या पालापाचोळ्यांनीच इतिहास घडवला आहे. इतिहास घडवणारे कोण असतात हे जनतेला चांगलेच माहीत आहे. आमची लढाई ही सत्तेसाठी नाही तर बाळासाहेबांच्या विचारांसाठी होती. त्यामुळे कोणाला काय म्हणायचं ते म्हणून द्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
(हेही वाचाः उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना नुसता त्रास दिला, एक दिवस महाराष्ट्राला सगळे सांगेन! नारायण राणेंचा इशारा)
उद्धव ठाकरेंची टीका
सध्या वादळात पालापाचोळा उडत आहे, तो खाली बसला की खरं चित्र जनतेच्या समोर येईल. हा पालापाचोळा उडतोय तो उडू द्या, इकडचा पालापाचोळा तिकडे जातोय. ही पानगळ सुरू आहे. सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत, असे म्हणत सामनातील मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे.
Join Our WhatsApp Community