राज्यात सध्या वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्याने आरोप प्रत्यारोपांचे नाट्य रंगले आहे. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प गुजरातला का गेला याचे कारण सांगितले आहे.
शिवसेना- भाजप युतीचे नवे सरकार स्थापन होऊन दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फाॅक्सकाॅन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील. तळेगावजवळील 1100 एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. 30 ते 35 हजार कोटींच्या सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. शिंदे गटातील आमदारांच्या बैठकीनंतर ते मीडियाशी बोलत होते.
( हेही वाचा: ‘प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाच कसा?’,फॉक्सकॉन प्रकल्पावरुन राज ठाकरेंचा संतप्त सवाल )
मागच्या सरकारने योग्य प्रतिसाद दिला नसावा
या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षांत योग्य तो रिस्पाॅन्स मिळाला नसावा, तो कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या. त्यावेळी हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात यावा, यासाठी प्रयत्न करणार का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आल्याने, यावर बोलताना ते म्हणाले की हो बिलकूल आम्ही नरेंद्र मोदींना भेटायला गेलो असताना, राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यासंदर्भात सांगितले होते. उद्योग तसेच पायाभूत सुविधांबाबत राज्याला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community