ओबीसी आरक्षणानंतरच निवडणुका घ्या, मुख्यमंत्र्यांची मागणी

140

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात या निवडणुका घेण्यात येणार आहेत. पण याबाबत आता भाजपकडून आक्षेप घेण्यात येत असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे.

राज्यातील 17 जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जारी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 18 ऑगस्ट रोजी या निवडणुका घेण्याचे आयोगाने सांगितले आहे. पण याचबाबत दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.

(हेही वाचाः पक्ष प्रमुखांबद्दल बोलाल, तर खबरदार – दीपक केसरकर)

ओबीसी आरक्षणानंतरच निवडणुका घ्या

ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये, अशी आपली भूमिका आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पहिल्यापासून प्रयत्न करत आहोत. त्यामुळे ओबीसी आरक्षणावर निर्णय झाल्यानंतरच या निवडणुका घेण्यात याव्यात. तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने देखील निवडणूक यंत्रणेवर मोठा ताण येऊ शकतो. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी आपण राज्य निवडणूक आयोगाला करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम

राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका शुक्रवारी, ८ जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काही दिवसांतच निवडणुकांच्या घोषणेचा कार्यक्रमही निवडणूक आयोगाकडून जाहीर केला आहे. त्यानुसार १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणुकीची प्रक्रीया २० जुलै रोजी होणार आहे. तेव्हापासून आचारसंहिता लागू होणार आहे.

(हेही वाचाः राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतरच मंत्रिमंडळविस्तार, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच)

शिंदे-फडणवीसांनी घेतली मोदी-शहांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्याच्या हितासाठी आपण शक्य ती सर्व मदत करणार असल्याचे आश्वासन यावेळी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.