राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढू लागले आहे. दुसऱ्या लाटेने तर राज्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या लाटेत मृत्यूचे देखील प्रमाण वाढत असल्याने, ठाकरे सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यातच आता राज्यातील जनतेसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला असून, यासाठी राज्य सरकार ६ हजार ५०० कोटी खर्च करणार आहे. मात्र याच दरम्यान आता काँग्रेस आमदारांनी पुढाकार घेतला असून, काँग्रेसचे आमदार आपले एक महिन्याचे मानधन सीएम रिलीफ फंडामध्ये देणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषद घेत, ही माहिती दिली.
काय म्हणाले थोरात?
सर्वांचे मोफत लसीकरण झाले पाहिजे यासाठी आम्ही आग्रही होतो. तशी भूमिका काँग्रेस पक्षाची कायम होती. यापूर्वीचे लसीकरणही मोफत झाले आहे. त्यामुळे आताही आम्ही मोफत लसीकरण करणार आहोत. यावर मोठा खर्च येणार असल्याने, मी माझे एक वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचे थोरात म्हणाले. तसेच काँग्रेसचे सर्व आमदारही त्यांचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही थोरात यांनी जाहीर केले. एवढेच नाही तर नागरिकांनी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
(हेही वाचाः खुशखबर! राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण!)
काय घेतलाय ठाकरे सरकारने निर्णय
राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय 28 एप्रिल रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गेल्या वर्ष-सव्वा वर्षापासून आपण कोविडची लढाई लढत आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरू आहे. आजतागायत ४५च्या पुढील वयोगटातील दीड कोटींपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे, हा देशातला विक्रम आहे.
(हेही वाचाः १ मेपासून तिसऱ्या टप्प्याचे लसीकरण नाही! आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती )
Join Our WhatsApp Community