मैत्री करायची तर प्रामाणिकपणे करा, काँग्रेसचा राष्ट्रवादीला थेट इशारा! पटोलेंच्या ट्वीटमुळे खळबळ

136

महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांतील वाद हे आजवर अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन या तिन्ही पक्षांतील नेत्यांनी एकमेकांवर टीका केली आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध केलेल्या ट्वीटमुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करत असल्याचे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच मैत्री करायची तर प्रामाणिकपणे करायची, सोबत राहून असे राजकारण करू नये, असा थेट इशारा पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे.

(हेही वाचाः राजद्रोह कायद्याला तूर्तास स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)

पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने या सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढेल, या भूमिकेवर तिन्ही पक्षांचे एकमत झाले होते. पण भंडारा-गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी युती करुन पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. भिवंडीतही महापालिकेतील काँग्रेसचे 19 सदस्य राष्ट्रवादीने आपल्याकडे घेतले. मैत्री करायची तर प्रामाणिकपणे करायची आणि शत्रुत्वही उघडपणे करायचं. सोबत राहून या पद्धतीचे राजकारण केले जात असेल, तर ते योग्य नसल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

काय आहे नानांचे ट्वीट?

मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असे ट्वीट काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

(हेही वाचाः राजद्रोह कायद्याला तूर्तास स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.