महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर मंगळवारी सुनावणी झाली. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांची महासुनावणी आता 14 फेब्रुवारीला घेतली जाणार आहे. यात पाचऐवजी सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. आता सध्या तरी पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाने 14 फेब्रुवारीला अंतिम सुनावणी केली जाणार असल्याचे सांगितले आहे. 14 ते 21 फेब्रुवारी यादरम्यान, ‘शिवसेना’ पक्ष कोणाचा हे समजणार आहे.
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आता सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी ही 14 फेब्रुवारीला होणार आहे. शिवसेनेतील फूट, विधानसभा अध्यक्षांची निवड, राज्य सरकारचा विश्वासदर्शक ठराव, राज्यातल्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तसेच सत्तासंघर्षावर ठाकरे आणि शिंदे गटाकडूनही याचिका करण्यात आल्या आहेत.
( हेही वाचा: शिवसेना कोणाची? सत्तासंघर्षाच्या सुनावणीपूर्वी संजय राऊतांचे सूचक ट्वीट; म्हणाले… )
मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी पार पाडली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद सुरु केला. युक्तीवादादरम्यान सिब्बल यांनी मागच्या सुनावणी वेळी करण्यात आलेल्या युक्तीवादाचा दाखला दिला. गेल्या सुनावणीवेळी आम्ही नबाम राबिया खटल्याचा दाखला दिला होता. तसेच,हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर न्यावे, अशी विनंती केल्याची आठवणही सिब्बल यांनी खंडपीठाला करुन दिली.
Join Our WhatsApp Community