महाराष्ट्रात सर्वत्र ६५वा महाराष्ट्र दिन साजरा होत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांना मुंबईतील हुतात्मा चौकात अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, हुतात्मा स्माराकात आल्यानंतर ऊर्जा मिळते. हुतात्म्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. राज्याला एक परंपरा आहे. निवडणुका येतात जातात; परंतु शेवटी आपली परंपरा आणि आरोप-प्रत्यारोपाची पातळी खालावली आहे. विरोधकांकडून शिव्याशाप याशिवाय काहीही पाहायला मिळत नाही. विरोधकांकडे आरोप करण्याशिवाय काही राहील नाही. काम करणाऱ्यांच्या पाठिशी महाराष्ट्र नेहमी उभा राहिला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
(हेही वाचा – Maharashtra Day 2024 : दिवस एक आणि वैशिष्ट्ये अनेक…जय महाराष्ट्र!)
सर्व गिरणी कामगारांना घरे देणार
मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुंबईतील पात्र सर्व गिरणी कामगारांना घरे देण्याची घोषणा केली. ‘मुंबई कामगारांच्या मेहनतीने आणि कष्टाने उभी राहिली आहे. आमचे सरकार जवळपास ५ हजार कामगारांना घरे वाटप करण्यात यशस्वी झाले. जेवढे पात्र गिरणी कामगार आहेत त्या सर्वांना जिथे आवश्यक आहे तिथे घरे देणार आहोत, असे अश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
अजून बरचं काही करायचं बाकी आहे
“६५वर्षांचा मोठा पल्ला गाठला आहे. अजून बरचं काही करायचं बाकी आहे. मागच्या दोन वर्षात सर्वसामान्यांच्या सरकारने अनेक निर्णय घेतले. योजना आणल्या, अनेक विकास प्रकल्पांना चालना दिली. म्हणून महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास हा खरा ध्यास आहे. गोरगरीब जनता, माताभगिनी यांच्या जीवनात आनंद आणणं हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community