मशिदींवरील भोंगे हटवण्याबाबत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाष्य केल्यानंतर त्याबाबत अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरुन आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. निवडणुकींवर डोळा ठेऊन अशी भाषणं करणं हे महाराष्ट्राला परवडणार नसल्याचं स्पष्ट मत अजित पवार यांनी मांडलं आहे.
अरे भाषण करणं सोपं आहे बाबा
काही लोक जाहीर भाषणात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्षानुवर्ष या महाराष्ट्रात सर्वजण सलोख्यानं राहत आहेत. राज्यात कुठेही जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, असा आपला प्रयत्न असतो. पण काही पक्षांचे नेते भोंगे लावायला सांगत आहेत. अरे भाषण करणं सोपं आहे. पण त्यांच्या या भाषणामुळे त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांना निवडून न येण्याची भीती वाटू लागली आहे. या सगळ्या विषयांपेक्षा राज्यात इतर कुठले विषय नाहीत का, रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का, रोजगार मिळणार आहे का, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.
(हेही वाचाः वातावरण चिघळणार? राज ठाकरेंच्या नावाला फासलं काळं!)
हे परवडणार नाही
कोविड काळात अनेक जणांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत. या राज्यासमोर इतरही अनेक प्रश्न आहेत. पण असं असताना निवडणूका डोळ्यासमोर ठेवून कोणाला तरी बरं वाटण्यासाठी अशी भडकाऊ भाषणं करायची हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचाः शिवसेना आता मांजरीचा आवाज काढण्याच्या सुद्धा लायकीची राहिली नाही, राणेंचा घणाघात)
Join Our WhatsApp Community