एसटी कर्मचा-यांच्या दुरावस्थेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जबाबदार असल्याचे सांगत, संपक-यांनी पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी शुक्रवारी जोरदार आंदोलन केले. यावेळी संपक-यांनी पवारांच्या घरावर दगडफेक देखील करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून या आंदोलनाची निंदा करण्यात येत आहे. पण याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे पोलिस यंत्रणेचं अपयश असल्याचं धक्कादायक विधान केलं आहे.
पोलिसांना माहीत असायला हवे होते
हे एकप्रकारे पोलिसांचे अपयश आहे. ज्यावेळी अशी घटना घडते, त्याची माहिती पोलिस यंत्रणांना माहीत असायला हवी होती. 12 तारखेला बारामतीत जाऊन निदर्शन करण्याचा इशारा याआधी आंदोलनकर्त्यांनी दिला होता. त्यामुळे सर्वांच्याच बाबतीत खबरदारी घेणं हे गरजेचं होतं. शरद पवार हे तर राष्ट्रीय नेते आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी पोलिस यंत्रणेवर टीका केली आहे.
(हेही वाचाः ‘आम्ही एसटी कर्मचा-यांच्या पाठीशी, पण…’ घरावरील आंदोलनानंतर पवारांची प्रतिक्रिया)
मास्टर माईंड शोधून काढू
एसटी कर्मचा-यांच्या बाबतीत न्यायालयाने जो निकाल द्यायचा तो दिला होता. न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली होती. आज जे घडलं ते महाराष्ट्रात कधीही घडलं नाही. शरद पवार यांच्या कामाची पद्धत सगळ्यांनाच माहीत आहे. पण हे धाडस दाखवण्याच्या मागे नक्कीच कोणीतरी मास्टर माईंड आहे. त्याला आम्ही नक्कीच शोधून काढू, असा थेट इशारा देखील यावेळी अजित पवार यांनी दिला आहे.
(हेही वाचाः फडणवीस म्हणतात, आंदोलनकारी एसटी कर्मचा-यांचं चुकलंच)
तळाशी जाऊन चौकशी करणार
असला प्रकार कोणाच्याच बाबतीत घडता कामा नये, ही आपल्या महाराष्ट्राची शिकवण आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तळाशी जाऊन दूध का दूध, पानी का पानी करू, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
सदावर्तेंना अटक
शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचा-यांनी आक्रमक आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांकडून यावेळी शरद पवार यांच्या घरावर दगड आणि चप्पलफेक करण्यात आली. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. एसटी कर्मचा-यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रक्षोभक भाषण केल्यामुळेच आंदोलनकारी एसटी कर्माचा-यांनी पवारांच्या घरावर आंदोलन केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे याची चौकशी करण्यासाठी सदावर्ते यांना गांवदेवी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सदावर्ते यांची दीड तास चौकशी केल्यानंतर अखेर आता सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे.
(हेही वाचाः पवारांच्या घरासमोरील आंदोलन, गुणरत्न सदावर्तेंना अटक)
Join Our WhatsApp Community