शिवसेना खासदार संजय राऊत हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. राष्ट्रवादीचा खासदार असलेल्या ठिकाणी पुढच्या वेळी शिवसेनेचा खासदार निवडून येईल, असं वक्तव्य राऊत यांनी केलं आणि अनेकांचे डोळे चमकले. पण याचवरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राऊतांना टोला लगावला आहे, उमेदवारांना तिकीट देण्याचे अधिकार राऊतांना आहेत की, उद्धव ठाकरे यांना?, असा सवाल त्यांनी केला आहे.
(हेही वाचाः राऊत म्हणतात, मुंबई आमच्या बापाची)
तिकीट देण्याचा अधिकार कोणाला?
शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस ही राज्याच्या सत्तेत आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले होते. पण यावर बोलताना अजित पवार म्हणाले, त्यांच्या कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून संजय राऊत तसं म्हणाले असतील. उद्या मी पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून जिथे शिवसेनेचा खासदार आहे तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करेन. पण उमेदवार मी जाहीर केला तरी त्याला तिकीट देण्याचा अधिकार मला आहे की शरद पवारांना? तसाच शिवसेनेत संजय राऊतांना तिकीट देण्याचा अधिकार आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना?, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
(हेही वाचाः आम्ही फालतू विषयांवर बोलत नाही, राणांना आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर)
काय म्हणाले होते राऊत?
शिरूरचे माजी शिवसेना खासदार शिवाजी आढळराव पाटील हे पुन्हा आपल्याला संसदेत दिसतील. लोकसभेत आम्ही दोघं एकत्र बसणार आहोत, असे विधान काही दिवसांपूर्वी खेड आंबेगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी केले होते. सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे हे खासदार आहेत. त्यामुळे सत्तेतील आपल्या घटक पक्षाबाबत केलेल्या या विधानामुळे राऊत हे पुन्हा एकदा चर्चेत आले होते.
Join Our WhatsApp Community