एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचं नवं सरकार राज्यात स्थापन झालं. पण याच सरकारवर आता जोरदार टीका होताना दिसत आहे. फडणवीसांनी एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरचा माईक काढून घेतला किंवा त्यांनी शिंदे यांना पत्रकार परिषदेत एक नाव लिहून दिलं, या घटनांमुळे या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच सुपर सीएम असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्याला आता स्वतः फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले फडणवीस?
अलिकडे माध्यमांकडे बातम्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे डेस्कवर बसून बातम्या करण्याचा धंदा सुरू झाला आहे. ज्यावेळी मी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांसमोरचा माईक घेतला तेव्हा पत्रकारांनी प्रश्न मला विचारला असल्याचे सांगितले होते, पण हे माध्यमांमध्ये दाखवण्यात आलं नाही. आणि मी जर माझ्या मुख्यमंत्र्यांना मी जर का चिठ्ठी लिहिली तर त्यात गैर काय आहे, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
(हेही वाचाः ‘तुमचा हाच अॅटिट्यूड असेल तर मी यापुढे बोलणार नाही’, शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर यांची भूमिका)
आमचे मुख्यमंत्री एकच
कुठल्याही सरकारमध्ये सुपर सीएम नावाचा प्रकार नसतो. आमच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे एकच मुख्यमंत्री आहेत, तेच आमच्या सर्वांचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत, असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच ही गोष्ट काही लोकांना बघवत नसल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community