राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अचानक रजेवर जाण्यामुळे, राज्यात राजकीय चर्चा रंगली आहे. मात्र मी केवळ कुटुंबाला भेटण्यासाठी रजेवर आलो असून, त्यात कुठलेही वेगळे कारण नसल्याचे संजय पांडे यांच्या निकटवर्तीय यांनी कळवले आहे.
मागितली होती रजा
रविवार सायंकाळ पर्यंत संजय पांडे हे मुंबईत होते व त्यांनी एक दोन बैठकांना देखील हजेरी लावली होती. दोन दिवसांपूर्वीच पांडे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव आणि गृहमंत्री यांच्याशी दोन दिवसांच्या सुट्टीवर जाण्याबाबत चर्चा केली होती. त्यावेळी त्यांना जाण्यास देखील सांगण्यात आले होते. त्यानंतर मात्र त्यांना रविवार पर्यंत थांबण्यास सांगण्यात आले, रविवारी झालेल्या बैठका आटोपून पांडे विमानाने चंदीगढ येथे दाखल झाले आहेत.
वादळामुळे चंदीगढमध्ये अडकून पडले
चंदीगढ येथे पांडे यांच्या पत्नी राहत असून, त्यांचा मुलगा अमेरिकेत राहण्यास आहे. पत्नीला भेटण्यासाठी ते चंदीगढ येथे आले आहेत. राज्यातील परिस्थिती वाईट असताना पोलिस विभागाच्या प्रमुखाचे अचानक अशाप्रकारे रजेवर जाण्याने सोमवारी राजकीय चर्चा रंगली. त्यामुळे संजय पांडे यांनी सोमवारी पुन्हा कर्तव्यावर हजर होण्याची तयारी केली, मात्र चक्रीवादळामुळे विमानसेवा बंद असल्याने संजय पांडे चंदीगढ येथे अडकून पडले आहेत. आज रात्रीपर्यंत मुंबईतील वादळ शांत होऊन विमानसेवा सुरू झाल्यावर उद्या संजय पांडे हे कर्त्यव्य बजावण्यास हजर होतील, अशी माहिती पांडे यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
(हेही वाचाः राज्याच्या पोलिस महासंचालकांनी का घेतली माघार?)
सेनेनकडून कारवाईची मागणी
महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळ असताना पोलिस महासंचालक संजय पांडे राज्याबाहेर सुट्टीवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पांडे यांच्या वर्तणुकीवर शिवसेना नाराज असून कारवाईची मागणी केली जात आहे. याआधीही संजय पांडे आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळ असताना पोलिस महासंचालक पदाची धुरा सांभाळणारे संजय पांडे विनापरवानगी चंदिगढला गेलेच कसे? असा सवाल विचारला जात आहे. संजय पांडे यांच्या वर्तणुकीवर शिवसेना नाराज आहे. संजय पांडे यांच्यावर तातडीने कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेने केल्याची माहिती आहे.
शिवसेनेच्या भूमिकेचा शोध घ्यायला हवा
शिवसेनेकडून पांडे यांच्यावर कारवाई होण्याची मागणी होत असताना, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मात्र शिवसेनेवरच टीका केली आहे. शिवसेनेची राजी-नाराजी ही प्रसंगानुरुप बदलत असते. परमबीर सिंग यांच्या आरोपांची जेव्हा संजय पांडे चौकशी करत होते, तेव्हा त्यांच्यावर सरकार खूश होते. पण आता पांडे अचानक रजेवर गेल्याने शिवसेना अचानक नाराज का झाली, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. सध्या कोरोना आणि चक्रीवादळाचे संकट महाराष्ट्रावर घोंघावत असताना, अशा संकटकाळी राज्यातील महत्त्वाच्या अधिका-यांनी राज्यात असणे अत्यंत गरजेचे आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी तर राज्याच्या पोलिस महासंचालकांनी राज्यात असायलाच हवे होते. पण शिवसेनेला कधीकधी कळवळा येतो, तर कधी त्यांची नाराजी एकदम उफाळून येते. त्यामुळे या प्रसंगानुरुप त्यांच्या बदलत्या भूमिकेचा शोध घेणे गरजेचे आहे, अशा शब्दांत प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे.
कोण आहेत संजय पांडे?
संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून नुकत्यात झालेल्या बदलीमुळे ते राज्य सरकारवर नाराज होते. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
Join Our WhatsApp Community