राज्याच्या पोलिस महासंचालकांनी का घेतली माघार?

परमबीर सिंग यांनी केलेल्या फोन रेकॉर्डिंगला घाबरुन संजय पांडे यांनी हा निर्णय घेतला का?, की त्यांना पोलिस दलात कार्यकाळ वाढवून मिळावा म्हणून पांडे यांनी हा निर्णय घेतला?

160

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करणारे, राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी या प्रकरणातून अचानक एक्झिट घेतली आहे. त्यामुळे पोलिस दलात उलटसुलट चर्चेला आता उधाण आले आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या फोन रेकॉर्डिंगला घाबरुन संजय पांडे यांनी हा निर्णय घेतला का?, की त्यांना पोलिस दलात कार्यकाळ वाढवून मिळावा म्हणून पांडे यांनी हा निर्णय घेतला, अशी चर्चा आयपीएस(भा.पो.से) लॉबीत सुरू आहे.

परमबीर सिंग यांच्यावर आरोप

राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास नकार देत, या प्रकरणात दुसरे तपास अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी, असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले. पांडे यांनी या प्रकारणातून अचानक काढता पाय घेतल्यामुळे, याला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिस दलातील पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे, तसेच सिंग यांचे अंडरवर्ल्डशी जवळचे संबंध असल्याचे आरोप केले आहेत. या आरोपांची चौकशी करण्यात यावी असे पत्र मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक यांना पाठवले होते.

(हेही वाचाः माझा मानसिक छळ होतोय, रश्मी शुक्लांची उच्च न्यायालयात याचिका!)

पांडेंचा चौकशी करण्यास नकार

सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देऊन राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. दरम्यान या प्रकरणात चौकशी सुरू असताना परमबीर सिंग यांनी पांडे यांचा फोन कॉल रेकॉर्ड करुन, उच्च न्यायालयात संजय पांडे यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती. त्यामुळे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. याबाबतचं पत्र त्यांनी राज्य सरकारला दिलं आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर बोलणे उचित ठरणार नाही. सरकार त्याबद्दल योग्य निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दिली आहे. पांडे यांनी या प्रकरणातून काढता पाय घेतल्यामुळे राज्यातील पोलिस दलात, तसेच आयपीएस लॉबीमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. परमबीर सिंग यांनी पांडे यांचा फोन रेकॉर्ड करुन न्यायालयात सादर केल्यामुळे, पांडे यांनी हे प्रकरण हाताळण्यास नकार दिल्याची चर्चा आहे.

परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढणार?

परमबीर सिंग यांनी ज्येष्ठ अधिकारी असलेले संजय पांडे यांना स्वतःहून फोन करुन, त्यांचे संभाषण रेकॉर्ड करणे बेकायदेशीर असल्याचे, एका अधिका-यांनी म्हटले आहे. बेकायदेशीररित्या फोन रेकॉर्डिंग प्रकरण न्यायालयात टिकू शकणार नाही. मात्र, परमबीर यांच्या अडचणी यामुळे नक्की वाढण्याची शक्यता आहे, असे जाणकारांचे मत आहे. बेकायदेशीररित्या फोन रेकॉर्डिंग केल्या प्रकरणी पोलिस महासंचालक पांडे, हे परमबीर सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल करू शकतात, अशी चर्चा आयपीएस लॉबीत सुरू आहे.

(हेही वाचाः आयपीएस अधिकाऱ्यांना परमबीर सिंग यांची का वाटते भीती? वाचा… )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.