पालक संघटनांच्या बैठकीला शिक्षणमंत्र्यांची दांडी

बैठकीला शिक्षणमंत्री उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत असून, यामुळे पालक संघटना आक्रमक झाल्या आहेत.

राज्यात कोरोनाच्या संकटामुळे आधीच शाळा बंद आहेत. पण खासगी शाळांच्या मनमानी कारभारामुळे पालक त्रस्त आहेत. मात्र, याची पर्वा ना शिक्षणमंत्र्यांना आहे, ना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना. खासगी शाळांकडून मनमानी शुल्क वसुलीच्या विरोधात पालकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी, शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीला शिक्षणमंत्री उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत असून, यामुळे पालक संघटना आक्रमक झाल्या आहेत.

शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी यांच्यासोबत ही बैठक होणार असून, शालेय शिक्षणमंत्री उपस्थित राहणार नसल्याने पालक आणि विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

(हेही वाचाः शिक्षणमंत्री नको रे बाबा… शिक्षण मंत्र्यांविरोधात आता मोहीम)

काय आहे संघटनांचे म्हणणे

शुल्क वाढीसंदर्भात राज्यपाल संघटना आक्रमक असून, विविध ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली आहेत. त्याचमुळे आता मंत्रालयात या विषयी बैठक लावण्यात आली असून, या बैठकीला स्वतः शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण प्रधान सचिव वंदना कृष्णा आणि शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनीही उपस्थित रहावे, असा आग्रह पालक संघटनांकडून करण्यात आला आहे.

(हेही वाचाः कोरोना इफेक्ट : शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के घट!)

शिक्षण विभागाचा वेळकाढूपणा

काझी हे शुल्क अधिनियम सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष असले, तरी त्यांनी मागील पाच महिन्यांत शुल्क सुधारणेचा आपला कोणताही अहवाल तयार केला नाही. हा अहवाल केवळ तीन महिन्यांत सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यामुळे केवळ चर्चा करुन शालेय शिक्षण विभाग वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप पालक संघटनांनी केला आहे. आता चर्चा नको तर शुल्क अधिनियमात सुधारणा करण्यासाठीचा निर्णय आम्हाला हवा आहे, सोबतच राज्यातील शाळांच्या ऑडिट संदर्भातील निर्णयही जाहीर करणे आवश्यक असून, त्यासाठी काझी यांच्यासोबत चर्चा न करता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आमच्यासोबत बैठकीला उपस्थित राहावे, अशी मागणी पालक संघटनांनी केली आहे.

(हेही वाचाः शैक्षणिक शुल्कावर नियंत्रण ठेवणारी समिती काय करते? उच्च न्यायालयाकडून विचारणा )

शिक्षणमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी

राज्यात अनेक खासगी शाळांनी शुल्कवाढ केली आहे. कोरोना संकटातून बाहेर पडत असताना, या अवाजवी शुल्कवाढीमुळे पालक संघटना आक्रमक झाल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बालभारती येथे नियोजित कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी, निवेदन देण्यासाठी पालक संघटनांचे प्रतिनिधी जमले होते. मात्र, शिक्षणमंत्र्यांनी शुल्कवाढीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर समाधानकारक उत्तर न दिल्याने संतापलेल्या पालकांनी त्यांच्याविरोधात बालभारतीच्या आवारात घोषणा दिल्या. परिणामी शिक्षणमंत्र्यांना दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडावे लागले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here