अखेर माजी गृहमंत्री देशमुखांना अटक! ५ समन्सला टाळले होते

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर सोमवारी, रात्री १२:३० वाजता अटक दाखवण्यात आली. तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यात अटक केली आहे. मंगळवारी त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ईडीने या अटकेची माहिती रात्री उशिरा दिली आहे. पाच समन्स पाठवल्यानंतर अनिल देशमुख सोमवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात वकीलासह हजर झाले होते.

१०० कोटींच्या वसुलीचे प्रकरण भोवले

अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची बेकायदेशीर वसुली केल्याचा आरोप आहे. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेखी पत्र देऊन हे आरोप केले होते. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल करून अनिल देशमुख यांना ५ जून रोजी पहिले समन्स पाठवले होते. मात्र त्यांनी वकिलामार्फत कारण पुढे करून ईडीकडून वेळ मागितला होता. मात्र देशमुख हे वेळ देऊनही ईडीच्या चौकशीला हजर झाले नव्हते. दरम्यान ईडीने एका पाठोपाठ एक असे चार महिन्यांत पाच समन्स देशमुख यांना पाठवले होते.

(हेही वाचा : शिवाजी पार्कात दिवाळीनिमित्ताने चक्क ईदच्या शुभेच्छा!)

ईडीकडून ही तिसरी अटक

अखेर १ नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजता दाखल झाले असता तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीने मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक केली आहे. मंगळवारी त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणात ईडीकडून ही तिसरी अटक असून यापूर्वी देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि खाजगी सचिव कुंदन शिंदेला या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

सत्यव्रत कुमारांना मुंबईत तात्काळ बोलवून घेण्यात आले

१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर या गुन्ह्याचा तपास ईडीचे सह संचालक सत्यव्रत कुमार हे करीत होते, मात्र त्यांना बढती देऊन त्यांची केंद्रात बदली करण्यात आली होती. अनिल देशमुख हे चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले असता सत्यव्रत कुमार यांना मुंबईत तात्काळ बोलवून घेण्यात आले होते. ईडीचे सह संचालक सत्यव्रत कुमार हे सायंकाळी ७ वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात हजर झाले असता अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई सुरू करण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने बरेच पुरावे गोळा केले असून या पुराव्याच्या आधारे रात्री उशिरा १२.३० वाजता अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here