बहुमत चाचणी होणारच, सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका

119

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला गुरुवारी बहुमताच्या चाचणीसाठी आवाहन केले आहे. त्यांच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर बुधवारी संध्याकाळी सुनावणी पार पडली. याबाबत आता सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. गुरुवारी होणा-या बहुमत चाचणीला सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला हा सर्वात मोठा धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

बहुमताच्या चाचणीला स्थगिती देण्यात यावी अशी याचिका शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. ही याचिका आता सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारला बहुमताच्या चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. महाविकास आघाडी आणि शिवसेनेसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे गुरुवार 30 जून रोजी सकाळी 11 वाजता विधीमंडळ सभागृहात बहुमत चाचणी होणार आहे.

देशमुख-मलिकांना परवानगी

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे सध्या तुरुंगात आहेत. राज्यसभा आणि विधान परिषद या दोन्ही निवडणुकांसाठी देशमुख आणि मलिकांना परवानगी नाकारण्यात आली होती. पण बहुमताच्या चाचणीसाठी या दोघांनाही परवानगी देण्यात आली आहे.

(हेही वाचाः आमचीच शिवसेना, खरी शिवसेना! शिंदेंच्या वकिलांचा दावा)

मुख्यमंत्री साधणार संवाद

बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत होणारा निर्णय हा बहुमताच्या चाचणीसाठी बंधनकारक असेल, असा निकालही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर मुख्यमं६ी उद्धव ठाकरे हे 9.30 वाजता जनतेशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचाः सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद, एका क्लिकवर)

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत आणि न्या. जेव्ही पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू यांच्याकडून बाजू मांडली, वकील नीरज कौल यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाजूने तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या बाजूने युक्तिवाद केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.