रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी स्थानिक पातळीवर सर्व राजकीय पक्षांकडून होत होती. मात्र या विरोधाला डावलून राज्य सरकारने या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. तसा प्रस्तावच सिडकोने मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याचा कोणताही प्रस्ताव आधी आला नव्हता. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने मंजूर केला आहे. आम्हाला दि.बा. पाटील यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे नवी मुंबईतील नव्या मोठ्या प्रकल्पाला दि.बा. पाटील यांचे नाव प्रकल्पग्रस्त कृती समितीने सूचवावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
(हेही वाचा : यंदा ५वी पास मुन्नाभाई १०वी पास होणार! )
मोदी भेटीची माहिती दिली!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. या भेटीची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळातील बैठकीत दिली आहे, असे शिंदे यांनी सांगितले. शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यावरही शिंदे यांना विचारण्यात आले. त्यावर शिवसेना हा नेहमीच विश्वासहार्य राहिला आहे. शब्द पाळणे ही आमची परंपरा आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला हा आदर्श आहे. त्यामुळेच पवार तसे बोलले असतील, असे सांगतानाच शरद पवार हे आमचे मार्गदर्शक आहेत, असेही त्यांनी सांगितले.
आंबेडकर दि.बा. पाटलांच्या नावासाठी आग्रही!
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. नवी मुंबईच्या इतिहासात दि.बा. पाटील यांचे बहुमोल योगदान राहिले आहे. नवी मुंबईसाठी ज्या भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा झाला, त्याचे नेतृत्व पाटील यांनी केले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात देखील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे ते लढाऊ नेते होते. पनवेलचे नगराध्यक्षपद भूषवलेल्या दि.बा. पाटील यांनी लोकसभेत चार वेळेस रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषविले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांचे समाज भूषण दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे. पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळासाठी दान देणाऱ्या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे, असे प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community