केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या राज्यातील शूरवीर आणि वीरांगणांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वीरता पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार, २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केली.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘शत जन्म शोधितांना…’ या कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.
सरकारने वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने हा दिवस गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात लहान मुलांना स्वातंत्र्यवीरांची प्रखर राष्ट्रभक्ती, त्यांचा त्याग त्यांना शिकवला जावा यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येईल. वीर सावरकर यांच्या मृत्यूला ५७ वर्षे झाली तरी अनेकांना वीर सावरकर कळले नाहीत. काही लोक त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करत आहेत. वीर सावरकर यांचा अतोनात छळ करण्यात आला, तरी त्यांनी तडजोड केली नाही. सावरकर यांना दोनदा जन्मठेप दिली होती, ब्रिटिशांना त्यांची दहशत होती. आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, सावरकर यांना जाऊन ५७ वर्षे उलटली तरी त्यांची दहशत कायम आहे. जर वीर सावरकर यांचे विचार लोकप्रिय झाले तर आपला बाजार उठेल, अशी भीती टीकाकारांना वाटत आहे.
Join Our WhatsApp Community