आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा! चंद्रकांत पाटील यांचा आरोप 

परमवीर सिंगाच्या पत्रानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जर नीतीमत्तेची थोडीशी का होईना चाड शिल्लक असेल, तर त्यांनी अनिल देशमुखांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

153

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत भ्रष्ट कारभाराचे वाभाडे निघत असून त्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत. पुणे शहर भाजपाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर भाजपने अलका टॉकीज चौकात रविवारी, २१ मार्च रोजी तीव्र आंदोलन केले. चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला केला. आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा सुरू असून, या सरकारला सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही, अशी टीका पाटील यांनी केली. तसेच देशमुख यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.

(हेही वाचा : गृहमंत्रालय कोण चालवतंय? अनिल देशमुख की अनिल परब? – देवेंद्र फडणवीस)

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा सुरू आहे. परमवीर सिंगाच्या पत्रानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जर नीतीमत्तेची थोडीशी का होईना चाड शिल्लक असेल, तर त्यांनी अनिल देशमुखांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. परमवीर सिंगाच्या पत्रानंतर आता स्पष्ट झाले आहे की, राज्यातील ठाकरे सरकार अतिशय भ्रष्ट सरकार आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह जिथे सापडला, त्याच ठिकाणी काल आणखी एक मृतदेह सापडला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे अतिशय खोलवर गेली आहेत. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अॅंटिलिया प्रकरणाचा मुद्दा सभागृहात मांडला नसता, तर हा विषय कधीच दाबला गेला असता. देवेंद्रजींनी आक्रमकपणे हा विषय लावून धरल्यामुळे वाझेवर कारवाई होऊ शकली. सचिन वाझेला तुम्ही सेवेत सामावून घेतल्यानंतर तो खंडणी वसूल करण्यासाठी एजंट म्हणून काम करत होता. तर अनिल देशमुख सभागृहात कशाच्या आधारावर सचिन वाझेचा बचाव करत होते, याचे त्यांनी उत्तर द्यावे कारण वाझेचे निलंबन तुम्हाला चालणार नव्हते. आतातर यावर परमवीर सिंग यांनी देखील याबाबत कबुली दिली आहे. त्यामुळे अजून वाझे अजून बोलायचा आहे. एनआयएकडे आता याचा सगळा तपास वर्ग झालाय. त्यामुळे वाझे जर बोलू लागला, तर अनेक गोष्टी बाहेर येतील असे चंद्रकांत पाटील म्हणालेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.