सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाला ना हरकत, पण…! काय म्हणाले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री?

मुंबई लोकलबाबत केंद्र सरकार निर्णय घेऊ शकते, तसा अधिकार आहे, पण केंद्र सरकार राज्याच्या अधिकारात हस्तक्षेप करणार नाही, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कमी केले आहेत. मुंबईतही रुग्ण संख्या फारच कमी झालेली आहे. तरीदेखील मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाला परवानगी देण्यात आली नाही. त्याविषयी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट राज्य सरकारवर अंगुलीनिर्देश केले आहेत.

राज्याचा प्रस्ताव येताच परवानगी देऊ! 

ज्या दिवशी राज्य सरकार सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाला अनुमती देण्यात यावी, असा एक ओळीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवेल, त्याच्या दुसऱ्या मिनिटात केंद्र सरकार त्याला परवानगी देईल. सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाला परवानगी देण्याला केंद्र सरकारची हरकत नाही, पण राज्य सरकारची त्याला परवानगी नाही, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. विशेष म्हणजे भाजपचीही सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाला अनुमती देण्यात यावी, अशी मागणी आहे. त्याकरता आंदोलनही करत आहे. राज्यात आता कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. त्यामुळे निर्बंध कडक करणे उपयोगाचे नाही, त्यामुळे लोकल प्रवासाला परवानगी देण्याला काही हरकत नाही, असेही दानवे म्हणाले.

(हेही वाचा : सरकार नसलेल्या राज्यांत भाजप राज्यपालांकरवी सत्ता राबवते!)

केंद्र निर्णय घेणार नाही! 

मुंबई लोकलबाबत केंद्र सरकार निर्णय घेऊ शकते, तसा अधिकार आहे, पण केंद्र सरकार राज्याच्या अधिकारात हस्तक्षेप करणार नाही. अन्यथा केंद्रावर ढकलून देण्यासाठी राज्य सरकारला आणखी एक मुद्दा मिळेल. नाही तरी काहीही झाले कि केंद्रावर खापर फोडण्याची सवय राज्य सरकारला लागली आहे, असेही रावसाहेब दानवे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here