सह्याद्री अतिथीगृहावरील डागडुजीचा खर्च ठरतोय व्यर्थ!

व्हीव्हीआयपींसाठी बांधण्यात आलेल्या सह्याद्री अतिथीगृहाच्या डागडुजीसाठी थोडेथोडके नाही, तर तब्बल १ कोटी ८९ लाख ३२ हजार ९३० रुपये इतके रुपये खर्च करण्यात आले आहेत.

175

कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे राज्य सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. ‘हिंदुस्थान पोस्ट’ने देखील काही महिन्यांपूर्वी राज्याच्या तिजोरीत कसा खडखडाट आहे याचे सविस्तर वृत्त दिले होते. मात्र एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना सह्याद्री अतिथीगृहाच्या डागडुजीसाठी करोडो रुपये खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने  फक्त डागडुजींसाठी लक्षावधी रुपयांची उधळण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या कामांवर केला खर्च!

व्हीव्हीआयपींसाठी बांधण्यात आलेल्या सह्याद्री अतिथीगृहाच्या डागडुजीसाठी थोडेथोडके नाही, तर तब्बल १ कोटी ८९ लाख ३२ हजार ९३० रुपये इतके रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये ३ फुटांची कपाऊंड वॅाल बांधणे, खिडक्या/ दरवाजे बसवणे, वुडन फ्लोरिंग बसवणे, संडास/बाथरूम दुरुस्त करणे अशी कामे केली गेली आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या कामासंदर्भात प्रकल्प शाखेनेही संशय व्यक्त केला होता. प्रकल्प शाखा ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येते. जे काम चालते त्यावर ही शाखा नजर ठेवते आणि यांचा रिमार्क महत्वाचा असतो. त्याचप्रमाणे एवढा खर्च केल्यानंतर स्वाभाविक प्रकल्प शाखेने फोटो मागवले पण त्यांना जे उत्तर देण्यात आले ते चक्रावून टाकणारे आहे. निघालेले खिडक्या-दरवाजे वाळवीच्या प्रादुर्भावामुळे पोखरून खराब झाले आहेत, त्यामुळे सदर सामान निकामी झाल्यामुळे डेब्रिजमध्ये फेकून देण्यात आल्याचे उत्तर शाखेला देण्यात आले.

सह्याद्री गेस्ट हाऊसच्या सिंलींगची घटना माझ्या निदर्शनास नाही. इमारत खूप जुनी आहे, स्ट्रक्चरली कोणताही धोका नाही. आम्ही त्याचं ऑडीट केले आहे. काम व्यवस्थित झाले आहे. कोणत्याही चौकशीची आवश्यकता वाटत नाही.
– अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

तरीही दुर्घटना कशा घडतात?

मुंबईतील याच सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनवरील फॉल सिलींग कोसळल्याची घटना जून महिन्यात घडली होती. या दुर्घटनेतून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले. अतिथीगृहात बैठक सुरू असतानाच अपघात होऊन, फॉल सिलींग कोसळल्याची घटना घडली होती. जर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्यांचे अधिकारी सह्याद्री अतिथीगृहाची देखरेख करतात आणि डागडुजीसाठी खर्च करत असतात मग अशा घटना का घडतात, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

(हेही वाचा : होय, ती माझी चूकच होती! वीर सावरकरांवरील वक्तव्यावर नितेश राणेंची कबुली)

कोरोना काळात याला आवर कोण घालणार?

एकीकडे कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीचे कंबरडे मोडले आहे. त्यातच मंत्र्यांच्या बंगल्यावर तसेच कार्यालयावर कोटींची उधळण केली जात आहे. प्रत्येकालाच आलिशान बंगला आणि कार्यालय हवे. पण सर्वसामान्यांच्या खिशातून येणा-या पैशांवर करण्यात येणा-या या कामावर काही तरी निर्बंध येणे गरजेचे असून, जर त्यावर निर्बंध आला नाही तर कामांची बिले निघत जातील आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी होईल हे मात्र नक्की. त्यामुळे कोरोना काळात तरी खर्च वाचवा रे, असे म्हणण्याची वेळ आता जनतेवर आली हेच खरं.



जे पडलेच पाहिजे अशाची निर्मिती करायची ही खासियत सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. आळीमिळी गुपचिळी अशा पद्धतीचा कारभार चालू आहे. राज्य सरकारने या संदर्भात कारवाई करावी. अशोक चव्हाण कारवाई करत नसतील, तर त्यांच्याकडे बोट जाते.
– आशिष शेलार, भाजप आमदार

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.