राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात आजवर अनेकदा वादाला तोंड फुटलं आहे. अनेकदा सरकामधील नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
समर्थ रामदासांशिवाय छत्रपतींना कोणी विचारलं असतं?, असे वादग्रस्त विधान राज्यपाल कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना केले. यावरुन आता राज्यपालांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. राज्यपाल माफी मागा, अशी मागणी आता सर्वच स्तरांतून करण्यात येत आहे. तसेच राजकीय वर्तुळातून देखील त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
(हेही वाचाः ‘मला वर जायच नाही, तुमच्या सोबतच रहायचय’, असे का म्हणाले छत्रपती संभाजी?)
काय म्हणाले राज्यपाल?
चाणक्यांशिवाय चंद्रगुप्तांना कोणी विचारलं असतं?, समर्थ रामदासांशिवाय शिवाजींना कोणी विचारलं असतं?, असे विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केले. यातून चंद्रगुप्त किंवा शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा माझा हेतू नाही. जशी त्यांच्या पाठीशी त्यांच्या आईची शिकवण होती, तसंच आपल्या समाजात गुरुंचा देखील सन्मान केला जातो. ज्याला गुरू मिळतो तो यशस्वी होतोच, असे विधान राज्यपाल कोश्यारी यांनी औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात केले.
राज्यपालांनी वक्तव्य मागे घ्यावे- उदयनराजे
राज्यपालांच्या या विधानावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानाचा भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही निषेध केला आहे. राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून, शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
(हेही वाचाः कॅलेंडर संपलं तरी आरक्षण मिळेना, ओबीसी आरक्षणाला पुन्हा नवी तारीख)
राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे.
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 28, 2022
राज्यपालांच्या या वादग्रस्त विधानावरुन आता सोशल मीडियावर राज्यपाल माफी मागा, असा हॅशटॅग सुरू झाला असून, त्यांच्या माफीची मागणी करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community