ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! अवघ्या १ रूपयात १० सॅनिटरी नॅपकिन देणार…

154

मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी ठाकरे सरकारमधील महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. ही योजना १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील महिलांसाठी योजना

मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व जागतिक प्रश्न आहे. गेल्या वर्षात मासिक पाळीच्या वेळी काळजी न घेतल्याने व सफाई कमीमुळे जगभरातील आठ लाख महिलांचा मृत्यू झाला आहे. स्त्रियांच्या होणाऱ्या मृत्यूमागे हे सर्वात मोठे कारण असून, हा प्रश्न कमी करण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी नाममात्र एक रुपयामध्ये ग्रामविकास खात्याकडून ही नवीन योजना राबवण्यात येणार आहे.

जगातील व राज्यातील आकडेवारी

भारतात दरवर्षी १२० दशलक्षाहून अधिक महिलांना मासिक पाळीचा त्रास होऊन आजारांचा सामना करावा लागतो. भारतात ३२० दशलक्ष मासिक पाळी होणाऱ्या स्त्रियांपैकी केवळ १२ टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात. यामुळे चार वर्षे भारतात ६०,००० हून अधिक स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोगामुळे होणारा मृत्यू पैकी दोन तृतीयांश मृत्यू मासिक पाळीबद्दलच्या समजूतीमध्ये निष्काळजीपणामुळे होतो. हीच आकडेवारी महाराष्ट्रात पाहायला गेले तर केवळ ६६ टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात. याबद्दलही शहरी भागाचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागातील फक्त १७.३० टक्के स्त्रियांपर्यंत सॅनिटरी नॅपकिनची सुविधा पोहोचत असते. या समस्येच्या मुळाशी गेले असता सॅनिटरी पॅड वापरण्याबाबत जागृकता नसणे, सॅनेटरी पॅड खरेदी करण्याची समस्या उद्भवणे अशा अनेक प्रश्नांना स्त्रिया सामोरे जात असतात.

दारिद्र्य रेषेखालील १९ वर्षावरील सर्व महिलांसाठी योजना

सध्या महाराष्ट्रात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेत फक्त १९ वर्षाखालील युवतींना सहा रुपयात सहा नॅपकिन्स असलेले कीट पुरवण्यात येतात. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. म्हणून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत दारिद्र्यरेषेखालील सर्व युवती व महिलांना या समस्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना व बचत गटांमधील महिलांना एक रुपये नाममात्र किमतीमध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये

१. राज्यातील ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिला व आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेतील सर्व महिला वगळून इतर दारिद्र्यरेषेखालील सर्व वयोगटातील युवती व महिलांना दर महिना एक रुपये नाममात्र शुल्कात १० सॅनिटरी नॅपकिन असलेले एक पाकीट महिलांना मिळणार.

२. स्थानिक पातळीवर गावस्तरावरच गावातील ग्रामसंघामार्फत महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जाणार.

३.शासन स्तरावर दर करार करण्यात येणार.

४. योजनेअंतर्गत महिलांना सॅनिटरी नॅपकीन किट याचा वापर करण्याबाबत, वैयक्तिक स्वच्छते संदर्भात जागृती व प्रचार करणार.

५. सॅनिटरी नॅपकिन व्यवस्थापन व विल्हेवाट.

६. या योजनेत जवळपास ६० लाख पेक्षा जास्त लाभार्थी महिला असल्याने सॅनिटरी नॅपकिनचे विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक गाव स्तरावर मशीन बसवण्यात येणार आहे. या मशीनमार्फत महिलांनी सॅनिटरी नॅपकिन ची विल्हेवाट लावावी, यासाठी जनजागृतीही करण्यात येणार आहेत. ही सर्व मशीन जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या स्वनिधीतून तसेच शासकीय निधी देणग्या तसेच सीएसआर निधीच्या माध्यमातून बसविण्यात येणार आहे.

या योजनेवर एका व्यक्तींसाठी अंदाजे चार रुपये गृहीत धरल्यास लाभार्थ्यांची संख्या ६० लाख अंदाजे असून वार्षिक २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.