देशमुखांनीही लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र! म्हणाले आता होऊनच जाऊद्या…

आता गृहमंत्र्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. 

परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे गृहमंत्री अनिल देशमुख चांगलेच अडचणीत सापडले. त्यानंतर पार गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होऊ लागली आहे. त्यांची पाठराखण करण्यासाठी महाविकास आघाडीतील अनेक नेते पुढे आले. चौकशीशिवाय कोणाचाही राजीनामा घेतला जाणार नाही, असे मंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे. पण आता अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनुसार चौकशी करुन, दूध का दूध पानी का पानी करुनच टाका, असे म्हटले आहे.

काय आहे देशमुखांचे पत्र?

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात माझ्यावर जे आरोप परमबीर सिंग यांनी केले आहेत त्याची चौकशी करुन, दूध का दूध पानी का पानी करावे, अशी मागणी केली आहे. त्या आरोपांची चौकशी लावण्यात आली तर मी त्याचे स्वागत करेन, असेही त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे. तसेच या पत्राबाबत माहिती देताना केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी सत्यमेव जयते असे म्हटले आहे. त्यामुळे आता गृहमंत्र्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, हे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

(हेही वाचाः ठाकरे सरकारची अधिका-यांनी उडवली झोप! कॅबिनेटमध्येही गाजला मुद्दा)

पाठराखण का?

माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी १०० करोड रुपयांचे टार्गेट दिल्याचा आरोप करत लेटर बॉंब टाकला. त्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र अनेक अणूबाँब फुटायला सुरुवात झाली. नैतिकतेचा प्रश्न निर्माण झाल्याने अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाकडून होत आहे. इतकंच नाही तर हा मुद्दा केंद्रातही गाजला. संसदेमध्येही या घटनेचे पडसाद उमटले. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना महाविकास आघाडी सराकारमधील नेते देशमुखांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांची पाठराखण का करत आहेत, असा सवाल आता विचारण्यात येत आहे.

(हेही वाचाः बुडत्याचा पाय आणखी खोलात… वाझेचे वाजले की बारा!)

मुख्यमंत्र्यांना बोलतं करा- फडणवीस

काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यात घडलेल्या १०० गोष्टींची यादी देत, त्याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. ज्या प्रकारच्या घटना महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत बाहेर येतात त्या राज्यासाठी चिंताजनक आहेत. त्यामध्ये हप्ता वसुली, ट्रान्सफर रॅकेट सारखे प्रकरण, कोरोना प्रकरण हाताळण्यात आलेले अपयश आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी मौन धारण केले आहे. एक शब्दही मुख्यमंत्री यावर बोलत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री जर बोलत नसतील तर संविधानिक प्रमुख म्हणून राज्यपालांनी त्यांना बोलतं करावे, अशी मागणी करण्यात आल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

(हेही वाचाः लवंगी की ‘अ‍ॅटम बॉम्ब’ लवकरच कळेल… फडणवीसांचं उत्तर की ‘धमकी’?)

सरकार चौकशी करणार?

परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर लावलेले आरोप गंभीर असून, यामुळे ठाकरे सरकारची प्रतिमा देखील मलीन होऊ लागली आहे. याचमुळे परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकार या समितीवर उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश नेमण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here