मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात भोंगे काढण्याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. त्या निर्णयात काही अटी घालून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या अटींचं पालन करत असलेल्या भोंग्यांवर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंनी शिवसेनेला केले मंदिराबाहेर उभे)
काय म्हणाले गृहमंत्री?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात भोंगे काढावेत असं कुठेही म्हटलेलं नाही. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावण्यात येऊ नयेत असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे ज्या मशिदींनी आणि मंदिरांनी परवानगी घेऊन भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावले आहेत ते हटवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचं पालन करणं गरजेचं असून कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचं प्रयत्न करू नये, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचाः आव्हान देताय? आता राज ठाकरेंचा आदेश येताच… पीएफआयला मनसेचं प्रत्युत्तर)
राज ठाकरेंचं अल्टिमेटम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 12 एप्रिल रोजी ठाण्यातील आपल्या सभेत भोंग्यांच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा आवाज उठवला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत 3 मेपर्यंत राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्याचे आवाहन राज्य सरकारला केले होते. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला दिला होता. भोंगे हटले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले होते.
Join Our WhatsApp Community