राज ठाकरेंवर कारवाई होणार? गृहमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

159

गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर घेतलेल्या सभेत ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी मशिदींसमोरील भोंग्यांविरोधात जोरदार आवाज उठवला. त्यामुळे राज ठाकरेंनी भडकाऊ भाषण करत धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप राजकीय वर्तुळात होत आहे. यावरुन आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्याचा तपास करुन कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या विधानाचे पडसाद

राज ठाकरे यांनी शनिवारी केलेल्या भाषणात राजकीय टीका करतानाच, धार्मिक विषयांच्या बाबतीतही आपली मते परखडपणे मांडली. राज्यात मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत, तर त्यांच्यासमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांच्या या वक्तव्याचा परिणाम म्हणून अनेक मनसे सैनिकांनी सोमवारपासून मशिदींसमोर हनुमान चालीसा लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे दोन समाज घटकांत तेढ निर्माण होत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काही राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. याचबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

(हेही वाचाः राज ठाकरेंच्या आदेशानंतर मशिदीसमोर हनुमान चालिसा सुरू!)

काय म्हणाले गृहमंत्री?

राज ठाकरेंच्या वक्तव्यांची योग्य ती चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेऊ, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. अलिकडच्या काळात काही पक्षांच्या माध्यमातून भडकाऊ भाषणे करुन समाजात संघर्ष निर्णाण करण्याचा प्रयत्न होत आहे. ही बाब देशाच्या आणि महाराष्ट्राच्या एकतेला धोकादायक आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांनी अशी वक्तव्यं टाळावीत, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.