संपकरी एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाला शुक्रवारी दुपारी आक्रमक वळण लाभले. एसटी कर्मचा-यांच्या दुरावस्थेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जबाबदार असल्याचे सांगत, संपक-यांनी पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी जोरदार आंदोलन केले. यावेळी संपक-यांनी पवारांच्या घरावर दगडफेक देखील केली.
या घटनेनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचा-यांच्या या आंदोलनाबाबत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कर्मचा-यांच्या भावना भडकावणारे कोण आहेत, हे सर्वश्रुत असल्याचं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या विरोधकांवर निशाणा साधला आहे.
(हेही वाचाः संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची शरद पवारांच्या निवासस्थानावर दगडफेक)
भावना भडकावणारे कोण?
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण, हे सर्वश्रुत आहे, असे ट्वीट करत दिलीप वळसे पाटील यांनी या आंदोलनाला विरोधक जबाबदार असल्याचे अप्रत्यक्षरित्या म्हटले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे. @PawarSpeaks
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) April 8, 2022
एसटी कर्मचा-यांना आवाहन
एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने चर्चेचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे क्रमप्राप्त आहे. सांविधानिक मार्गाने तसेच संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न समोर मांडावेत. आंदोलनाला अनिष्ट वळण देऊन कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी आंदोलनकारी एसटी कर्मचा-यांना केले आहे.
आंदोलनाला अनिष्ट वळण देऊन कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये, असे आंदोलकांना नम्र आवाहन आहे.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) April 8, 2022
(हेही वाचाः अखेर अजित पवारांनी मास्क काढलाच! म्हणाले, ‘सासुरवाडीत आल्यानंतर…’)
Join Our WhatsApp Community