महाराष्ट्राला मिळणार नवे राज्यपाल?; भाजपाच्या गोटात चर्चा

81

राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत असून, येत्या काळात महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या मिशन छत्तीसगडसाठी रमेश बैस याना राज्यपाल पदावरून कार्यमुक्त केले जाणार असल्याची चर्चा भाजपाच्या गोटातून ऐकायला मिळत आहे.

( हेही वाचा : सावधान! कबुतरांपासून रहा चार हात लांब, अन्यथा आरोग्यावर होईल गंभीर परिणाम)

छत्तीसगडमध्ये येत्या काळात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना प्रमुख चेहरा म्हणून समोर करण्याची तयारी सुरू आहे. याबाबत अंतिम निर्णय झाल्यास बैस राज्यपाल पदावरून कार्यमुक्त होतील आणि महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळतील. नव्या राज्यपालांच्या नावांमध्ये पुन्हा एकदा पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे नाव आघाडीवर आहे.

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यकाळात त्यांच्या वक्तव्यांवरून सामान्य जनतेचा रोष कमी करण्यासाठी त्यांची पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, आता दोन महिन्यांतच ते छत्तीसगडमध्ये परतण्याची चर्चा सुरू झाली आहे.

छत्तीसगडमध्ये वर्षाखेरीस विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. तेथे भाजपकडे बैस यांच्यासारखा प्रभावी चेहरा नाही. त्यामुळे त्यांच्याकडे या निवडणुकीची जबाबदारी देण्यावर भाजपचा भर आहे.

बैस यांची राजकीय कारकीर्द

  • रमेश बैस हे छत्तीसगडच्या रायपूर लोकसभा मतदारसंघातून सातवेळा निवडून आले आहेत. शांत आणि संयमी नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर पक्षाचा आणि जनतेचाही ते सर्वमान्य चेहरा आहेत.
  • त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवून छत्तीसगडची सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यांनी जुलै २०२१ मध्ये झारखंडचे राज्यपाल म्हणून तर त्यापूर्वी जुलै २०१९ ते २०२१ पर्यंत त्रिपुराचे राज्यपालपद सांभाळले आहे.
  • महाराष्ट्रातही निवडणुका लागणार आहेत. यामुळे बैस छत्तीसगडमध्ये परतले, तर महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून भाजप कुणाच्या नावाचा विचार करेल, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.