मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक- सीमावाद पुन्हा उफाळून निघाला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मंत्री दावे-प्रतिदावे करत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांनी वादग्रस्त भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केली. यावेळी सीमाप्रश्नावरुन कर्नाटकचे उच्च शिक्षणमंत्री सी.एन.अश्वथ्य नारायण यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. मुंबईत 20 टक्के कानडी नागिरक असल्याचे म्हणत मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा, अशी मागणी करत त्यांनी महाराष्ट्राला पुन्हा डिवचले आहे.
बेळगाव केंद्रशासित करायचे असेल तर आम्हालाही मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करता येते, असे नारायण म्हणाले. महाजन आयोगाने केलेल्या शिफारशी महाराष्ट्राने फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता महाजन आयोगाचाही काही प्रश्न नाही. महाराष्ट्राने दाखल केलेला सर्वोच्च न्यायालयातील खटला टिकणार नाही. प्रश्न सोडवण्याचा अधिकारी संसदेला आहे. आम्ही शांतताप्रिय आहोत, आम्ही कधीच महाराष्ट्रातील कन्नड जनतेला फूस लावत नाही. सीमाप्रश्न संपलेला असून, याबद्दल चर्चादेखील करु नये, असेही नारायण म्हणाले.
महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही – बोम्मई
सीमाप्रश्नावर विधानसभेत महाराष्ट्राने एकमताने ठराव मंजूर केल्यानंतर कर्नाटक सरकारचा तिळपापड झाला आहे. ठरावावर नाराजी व्यक्त करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी पुन्हा आपली बडबड सुरु केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या ठरावाला काहीच अर्थ नसून एक इंचही जमीन देणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.