सध्या महाराष्ट्र्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे, मंगळवारी, ६ डिसेंबर रोजी बेळगावनजीक कन्नड रक्षण वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड केली. त्यामुळे महाराष्ट्रात वातावरण तणावग्रस्त बनले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना दूरध्वनी करून हे प्रकार थांबवण्यास सांगितले आहे, मात्र एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तापला आहे. महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे संताप निर्माण झाला आहे. यासंदर्भात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. पण त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. हे प्रकार वेळीच थांबले नाहीत तर महाराष्ट्राच्या संयमलाही मर्यादा आहेत. येत्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात होणारे हल्ले थांबले नाहीत तर महाराष्ट्राने आतापर्यंत राखून ठेवलेल्या संयमाची जागा वेगळी गोष्ट घेऊ शकते. मग त्यानंतर जे काही होईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची असेल, महाराष्ट्रातील जनतेची भूमिका ही संयमाची आहे. त्याला मर्यादा येऊ नयेत, हीच माझी इच्छा आहे. पण कर्नाटकचे मुख्यमंत्रीच चिथावणी देऊन हल्ले घडवत असतील तर हा देशाच्या ऐक्याला धोका आहे. हे काम कर्नाटकात होत असेल तर केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. उद्यापासून दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. तेव्हा महाराष्ट्रातील खासदारांनी ही गोष्टी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानावर घातली पाहिजे. अन्यथा उद्या महाराष्ट्रात कोणी कायदा हातात घेतला तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल, असेही शरद पवार यांनी सांगितले.
(हेही वाचा ६ डिसेंबर ‘शौर्य दिवस’ म्हणून का होतोय ट्विटर ट्रेंड?)
Join Our WhatsApp Community