बेळगावनजीक महाराष्ट्राच्या गाड्या फोडल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. राज्यातील सर्व पक्षांकडून आता कर्नाटकाला इशारे दिले जात आहेत. खुद्द एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे, अन्यथा आपण बेळगावला जाणार असा इशारा दिला आहे. तसेच राज्यातही आता कर्नाटकाच्या गाड्यांना लक्ष्य केले जाऊ लागले आहेत. अशा सर्व पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री आता वर्षा बंगल्यावर जमायला सुरुवात झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.
कोणत्या विषयावर होणार चर्चा?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता राज्य सरकार सक्रिय झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारमधील सर्व मंत्र्यांना तातडीने वर्षावर बोलविले आहे. तिथे कर्नाटकाशी सुरु असलेला सीमावाद आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयातील खटला, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा, मंत्र्यांचे बेळगावमध्ये जाणे आदी गोष्टींवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर जत, सोलापूरच्या प्रश्नावर देखील निर्णय होण्याची शक्यता आहे.
संसदेच्या अधिवेशनात येणार विषय
विशेष म्हणजे बुधवारी, ७ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यानुसार केंद्रात काय भूमिका घ्यायची यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. अधिवेशनात हा विषय आणून केंद्र सरकारला यात हस्तक्षेप करायला लावण्यासंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यातील सर्व पक्षीय खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. त्याविषयीदेखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community